मुंबई – दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘झुंड’ या चित्रपटाचा अखेर आज (दि. 23) ऑफिशल ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात बॉलिवूडचे महानायक अभिनेते अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर याला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. हा ट्रेलर काही वेळातच लाखो लोकांनी बघितला आहे.
दरम्यान, या चित्रपटात अमिताभ बच्चन निवृत्त फुटबॉल प्रशिक्षक विजय बारसे यांची भूमिका साकारत आहेत. क्रीडा प्रशिक्षक विजय बारसे आणि त्यांच्या टीमच्या संघर्षाची कहाणी झुंड मध्ये पाहायला मिळणार आहे. सोनसाखळी चोरणाऱ्या, गांजा विकणाऱ्या, गुंडगिरी करणाऱ्या मुलांची टीम बनवू पाहण्याचं स्वप्न विजय पाहत असतात.
मात्र झोपडपट्टीत राहणाऱ्या या मुलांना कॉलेज कॅम्पसमध्ये आणण्याला अनेकांचा विरोध असतो. अशा मुलांचं आयुष्य ते कशा पद्धतीने बदलतात हे सर्व या चित्रपटात दिसून येणार आहे. तसेच, आणखी एक विशेष बाब म्हणजे झुंडच्या निमित्ताने महाराष्ट्राची लाडकी आर्ची-पारश्याची जोडी म्हणजेच, रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. दरम्यान, नागराजचा ‘झुंड’ हा चित्रपट येत्या 4 मार्चला मोठ्या पडद्यावर पदर्शित होणार आहे. लॉकडाऊनमुळे या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी अनेक अडचणी आल्या होत्या.