झारखंडमधील पाकूर जिल्ह्यात बुधवारी सकाळी एक मोठा रस्ते अपघात झाला आहे. बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला आहे तर 16 जण जखमी झाले आहेत. आम्रपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पडेर कोला गावाजवळ हा अपघात झाला आहे. भरधाव गॅस सिलिंडरने भरलेल्या ट्रकने बसला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लिट्टीपारा-आम्रापाडा मुख्य रस्त्यावर पडेरकोलाजवळ समोरून येणाऱ्या एका खासगी बस आणि सिलेंडरने भरलेल्या ट्रकची समोरासमोर धडक झाली. अनियंत्रित ट्रक बसवर आदळला. ही धडक इतकी जोरदार होती की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. मोठा आवाज ऐकून आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळ गाठून पोलिसांना माहिती दिली.
या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातग्रस्त प्रवाशांची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. या अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि स्थानिक लोकांच्या मदतीने मदत आणि बचाव कार्य सुरू केले. अपघातातील मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.