भाजपाच्या अहंकारी राजकारणाला झारखंडच्या जनतेने नाकारलं- शरद पवार

मुंबई: झारखंड निवडणुकीचे निकाल पाहता देशातील जनता भाजपाविरोधी असल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्रातली सत्तेची ताकद आणि आर्थिक ताकद वापरूनही भाजपाच्या अहंकारी राजकारणाला झारखंडच्या जनतेने नाकारलं. त्याबद्दल मी झारखंडच्या जनतेचे धन्यवाद देतो, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी दिली आहे.

शरद पवार म्हणाले, झारखंडसह, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान या पाच राज्यातून भाजपा हद्दपार झाली आहे. यामुळे देशातील इतर राज्यांचाही आत्मविश्वास वाढला आहे. सरळ दिसत आहे की भाजपाला उतरती कळा लागली आहे व आता ही उतरण थांबू शकणार नाही.

सुधारित नागरिकत्व कायद्याचा प्रभाव झारखंड निवडणुकांमध्ये दिसतोय. देशात CAA किंवा NRC सारखे कायदे आणण्याची आवश्यकता नव्हती. या मुद्द्यांवरून समाजात आणि देशात धार्मिक तेढ वाढवण्याचा प्रयत्न होतोय. पंतप्रधान मोदी भाषणात म्हणाले की, CAA व NRC या विषयांवर मंत्रिमंडळात फारशी चर्चा झाली नाही. मात्र गृहमंत्री स्पष्ट म्हणाले होते की NRC आणणार. राष्ट्रपतींच्या अभिभाषणातही याचा उल्लेख होता. यानंतरही यावर चर्चा झाली नसल्याचे पंतप्रधान म्हणतात, त्यामुळे पंतप्रधान जे सांगतात आणि वस्तुस्थिती यात खूप अंतर आहे.

देशात अनेक राज्यात,शहरात याविरोधात मोर्चे सुरू आहेत. असेच सुरू राहिले तर माझी खात्री आहे की योग्य वेळी लोक झारखंड सारखेच उत्तर भाजपाला देतील. आता लोकचळवळ सुरू होत आहे, संघर्षाची तीव्रता वाढते आहे. माझं लोकांना आवाहन आहे की, तुमचा राग शांत पद्धतीने व्यक्त करा. जाळपोळ करू नका, देशात अशांतता निर्माण होईल असे कोणी वागू नये. सत्तेवर असलेल्या घटकांनी याबाबत शांतपणे पावलं टाकली पाहिजेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.