देवघर (झारखंड) : झारखंडमधील देवघरमध्ये मंगळवारी पहाटे भाविकांना घेऊन जाणारी खासगी प्रवाशी बस आणि गॅस सिलेंडरच्या ट्रकची समोरा-समोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला. यात ६ कावड यात्रेकरुंचा मृत्यू झाला आहे. तर २४ हून अधिकजण जखमी झाले आहेत. मोहनपूर पोलिस स्थानकाच्या हद्दीतील जमुनिया जंगलाजवळ पहाटे ५.३० च्या सुमारास हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. बाबा नगरी देवघर येथील बाबा बैद्यनाथ धाम येथे जलाभिषेक केल्यानंतर कावड यात्रेकरुंची बस दुमका येथील बासुकीनाथ मंदिराच्या दिशेने जलाभिषेक करण्यासाठी जात होती. याचदरम्यान, मोहनपूर पोलीस स्थानक क्षेत्रातील जमुनिया येथे यात्रेकरुंची बस आणि एलपीजी सिलिंडर वाहून नेणा-या ट्रकचा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की यात ५ कावड यात्रेकरुंचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती दुमका झोनचे महानिरीक्षक शैलेंद्र कुमार सिन्हा यांनी दिली आहे. या अपघातात २४ हून अधिक प्रवाशी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये दाखल करण्यात आले आहे. यातील अनेक जखमी भाविकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी कावडीयांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. सध्या सुरु असलेल्या श्रावण महिन्यात सोमवारी देवघर येथील बाबाधाम मंदिरात सुमारे ३ लाख भाविकांनी दर्शन घेतले.