भाजपा नेत्याच्या १६ वर्षाच्या मुलीची हत्या; मृतदेहाचे डोळे बाहेर काढून केले असे काही…

झारखंड – पलामू जिल्ह्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दहावीत शिकणाऱ्या एका १६ वर्षाच्या मुलीची हत्या करण्यात आली आहे. या मुलीची हत्या करण्याआधी तिचे डोळे बाहेर काढण्यात आले होते. त्यांनतर मृतदेह झाडाला लटकविण्यात आला आहे. पीडित मुलगी ही स्थानिक भाजपा नेत्याची होती. हा घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली असून एकास ताब्यात घेतले आहे.
प्रदीप कुमार सिंह धुनक, वय २३ यास पोलिसांनी अटक केली असून प्रदीप हा मुख्य संशयित आरोपी असून विवाहित आहे. त्याच्यासोबत इतरही काहीजण सहभागी असल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलिसांना घटनास्थळी मिळालेल्या मोबाइलमधील कॉल डेटा रेकॉर्डच्या (सीडीआर) आधारे ही कारवाई केली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
७ जून रोजी सकाळी १० वाजता घर सोडल्यानंतर मुलगी बेपत्ता होती. मुलीच्या कुटुंबाने मंगळवारी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद केली होती. पोलिसांकडून शोध सुरु असताना गावकऱ्यांना जंगलात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत पीडितेचा मृतदेह आढळून आला. हत्या करण्याआधी पीडितेला अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. यानंतर आत्महत्या दर्शवण्यासाठी हत्या करुन मृतदेह झाडाला लटकवण्यात आला असावा अशी शक्यता व्यक्त केली आहे.
काही दिवसांपूर्वी पीडित तरुणी आणि कुटुंबामध्ये जोरदार भांडण झालं होते. यानंतर ती बेपत्ता झाली होती. यासंदर्भात पोलीस अधीक्षक संजीव कुमार यांनी पीडित मुलगी आणि आरोपी एकमेकांना ओळखत असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.
दरम्यान, झारखंड भाजपा प्रवक्ते प्रतूल सहदेव यांनी पोलीस योग्य तपास करु शकले नाही तर स्वतंत्र तपासाची मागणी करणार असल्याचे म्हटले आहे.





