जेट एअरवेजचे लवकरच ‘टेक ऑफ’; कंपनीचा शेअर 5% टक्क्यांनी उसळला

मुंबई – खेळत्या भांडवलाच्या अभावामुळे अडचणीत असलेली जेट एअरवेज कंपनीची पुन्हा सुरू होण्याची शक्यता बळावली आहे. या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचा आराखडा राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाने मंजूर केला आहे.
90 दिवसाच्या आत या कंपनीला उड्डाणासाठी स्लॉट देण्याची सूचना करण्यात आली. या कंपनीला पुन्हा स्लॉट देण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल असे सरकारी अधिकाऱ्यांनी सूचित केले. खेळते भांडवल नसल्यामुळे एप्रिल 2019 पासून ही विमानसेवा बंद करण्यात आली होती.
त्यानंतर ऑक्टोबर 2020 मध्ये मुरारीलाल जालान आणि कालरॉक कॅपिटल यांनी या कंपनीत गुंतवणूक करण्याची इच्छा दर्शविली होती. आता नागरी विमान वाहतूक महासंचालनालय या संदर्भात काय भूमिका घेते याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. जाट एअरवेजला या पर्वीचे स्लॉट मिळणार नाहीत. नव्याने त्यांना नव्या नियमाप्रमाणे स्लॉट मिळतील असे महासंचालनालयाने सूचित केले आहे.
कंपनी न्यायाधिकरणाने जेट एअरवेजचा पुनरूज्जीवन आराखडा मंजूर केला. या कारणामुळे जेट एअरवेज कंपनीच्या शेअरच्या भावात आज पाच टक्क्यांनी वाढ झाली. गुंतवणूकदारांनी गेल्या पंधरा दिवसापासून या कंपनीच्या शेअरची खरेदी सुरू केली होती. आगामी काळातही या कंपनीचा शेअर वाढण्याची शक्यता आहे




