जेजुरी, {शिवराज झगडे} – महाराष्ट्राचे कुलदैवत आणि बहुजन बांधवांचा लोकदेव असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाचा मर्दानी – म-हाठमोळा दसरा त्याच्या साजऱ्या गोजऱ्या नावाप्रमाणे साजरा झाला. उत्सवामध्ये शहरातील अठरा पगड जातीधर्मातील समाजबांधवांनी परंपरेंनुसार आपापली सेवा श्रींच्या चरणी रुजू करीत मानपान दिले घेतले. सालाबादप्रमाणे सर्व धार्मिक विधी होत ऐतिहासिक खंडास्पर्धेने सोहळ्याची सांगता झाली. शनिवारी (दि.१२) देवांची पूजा अभिषेक, भूपाळी आरती झाल्यानंतर मुख्य पुजारी, सेवेकरी विश्वस्त मंडळाच्या हस्ते घट उठविण्यात आले/ त्यानंतर ध्वजपूजन, शस्त्र, नगारा पूजन करण्यात आले. सायंकाळी ६वाजता मावळत्या सूर्याच्या साक्षीने इनामदार पेशवे, खोमणेपाटील, माळवदकर पाटील यांनी इशारा करताच खंडेरायाच्या पालखी सोहळ्याने सनई चौघड्याच्या मंगलमय सुरात सीमोल्लंघन,आपटा पूजन, देव भेटाभेट सोहळ्यासाठी गडकोटातून प्रस्थान ठेवले. यावेळी ग्रामस्थांनी भंडाऱ्याची उधळण करीत जयघोष केला. यावेळी प्रमुख विश्वस्त अनिल सौन्दडे, विश्वस्त पांडुरंग थोरवे,पोपट खोमणे,अभिजित देवकाते, विश्वास पानसे, मंगेश घोणे, डॉ. राजेंद्र खेडेकर, पुजारी गणेश आगलावे, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे आदींसह सर्व जाती धर्मातील समाजबांधव मानकरी, खांदेकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गडकोट प्रदिक्षणा करून सोहळा दक्षिण दिशेला सुसरटिंगी या ठिकाणी स्थिरावला तर रात्री ९ च्या सुमारास मूळस्थान कडेपठार येथील खंडेरायाच्या पालखी सोहळ्याचे भेटाभेट विधीसाठी प्रस्थान झाले. रात्री १२:३० च्या दरम्यान कडेपठार येथील आपटा पूजन उरकले. मध्यरात्रीच्या दरम्यान फटाक्यांच्या आतषबाजीत सनईच्या सुरात जयाद्री डोंगररांगेच्या कुशीत दोन्ही पालख्यांचा भेटाभेट सोहळा १ तास रंगला. (कडेपठारचा पालखी सोहळा ८०० फूट उंच कड्यावर असतो तर मल्हार गडावरील पालखी जयाद्री डोंगराच्या दरीमध्ये असते. फटाक्यांची आतषबाजी व हवाईचा प्रकाश यामध्ये दोन्ही पालखीतील उत्सवमूर्तींची भेट आरशातून केली जाते. हा उत्सव फक्त दसऱ्याच्या मध्यरात्रीच होतो). त्यानंतर कडेपठार पालखी सोहळ्याने परतीकडे प्रस्थान ठेवले तर मल्हार गडावरील पालखी सोहळा रमण्यातील आपटा पूजन करीत नगर प्रदिक्षणेसाठी मार्गस्थ झाला. स्मशानभूमीतील रोकडोबा मंदिर, नगरपालिका चौक, जामा मस्जिद, मुख्य महाद्वार मार्गाने पालखी सोहळा सकाळी गडावर दाखल झाला. यावेळी चौका चौकामध्ये ग्रामस्थांच्या वतीने रांगोळ्या काढल्या होत्या. भुईनले आतषबाजी तर धनगर बांधवांकडून लोकर उधळण करीत लोकगीते गात सुंबरान मांडण्यात आले. पारंपारीक लोक कलावंतांनी पालखीपुढे भक्तिगीते गात आपली सेवा रुजू केली. “रोजमुरा”वाटप झाल्यानंतर उत्सवमूर्ती मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात नेण्यात आल्या. खंडा स्पर्धेला सुरुवात झाली. सोनोरीचे सरदार महिपतराव पानसे यांनी १७६१ साली नवसपूर्तीसाठी सुमारे ४२ पौंड वजनाचा पोलादी खंडा (तलवार) खंडेरायाला अर्पण केली होती. खंडा तोलने स्पर्धेत अंकुश गोडसे प्रथम ३० वर्षांपासून येथील युवकवर्ग एका हातात खंडा तोलने, तसेच विविध चित्त थरारक कसारतींचा सराव करून दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी स्पर्धेत उतरतात. देवसंस्थानच्या वतीने आयोजित केलेल्या खंडा तोलने स्पर्धेत यावर्षी ४७ स्पर्धक उतरले होते. यामध्ये प्रथम -अंकुश गोडसे, द्वितीय -मंगेश चव्हाण, तृतीय -अमोल खोमणे, चतुर्थ -हेमंत माने, सुहास खोमणे, उत्तेजनार्थ -विजय राऊत, सौरभ सकट, बाबा माने यांनी यश प्राप्त केले. शिवाजी राणेंच्या चित्तथरारक प्रात्यक्षिके एका हाताने तलवार उचलून गरगर फिरवणे, दाताने तलवार तोलून जोर बैठका मारणे आदी चित्तथरारक कसरतीमध्ये सुमारे १७ जणांनी सहभाग घेतला. यामध्ये प्रथम -शिवाजी राणे, द्वितीय -नितीन कुदळे, तृतीय -सचिन कुदळे, चतुर्थ -विशाल माने, शुभम कुदळे, उत्तेजनार्थ – विजय राऊत, अक्षय गोडसे हे विजेते ठरले. परीक्षक म्हणून सुधीर गोडसे, जालिंदर खोमणे, कृष्णा कुदळे यांनी काम पाहिले. विजेत्या स्पर्धकांना देवसंस्थानच्या वतीने रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविले. लोककलावंत व प्रमुख ग्रामस्थ मानकरी यांचाही सन्मान करण्यात आला.