प्रभात वृत्तसेवा जेजुरी – कुलदैवत खंडेरायाच्या मंदिर गडकोट आवाराचे व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री मार्तंड देवसंस्थान विश्वस्त समितीने शनिवारी (दि.१५) होळकर तलावानजिक स्वतःच्या मालकीच्या जागेत नियोजित बहुउद्देशीय इमारत व भक्तनिवास यांच्या भूमिपूजन सोहळ्याला ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला. सध्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. आचारसंहिता काळात हा धार्मिक कार्यक्रम घेऊ नये. बहुतांश विश्वस्त राजकीय पक्षाशी निगडित आहेत. असे निवेदन ग्रामस्थ मानकरी खांदेकरी, सेवेकरी, पुजारी, माजी विश्वस्तांच्या वतीने पोलीस ठाण्यात देत आचारसंहिता काळात घेतलेल्या कार्यक्रमामुळे विश्वस्तांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.२०२२ साली तत्कालीन विश्वस्त मंडळाने होळकर तलावालगत गोरगरीब व सर्वसामान्य नागरिक व भाविकांना आरोग्याच्या सुविधा अल्प दरात मिळाव्यात या उद्देशाने अत्याधुनिक रुग्णालयासाठी जागा खरेदी केली होती. मात्र, सध्या कार्यरत विश्वस्त मंडळाने सहायक धर्मादाय आयुक्त पुणे यांच्या आदेशाने उद्दिष्टात बदल करीत भक्तनिवास व बहुउद्देशीय इमारत बांधण्याचा घाट घातला आहे. ग्रामस्थ मंडळाला विश्वासात न घेता आचारसंहिता काळात घाई घाईने भूमिपूजन कार्यक्रम करण्याचा घाट घातल्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले. माजी प्रमुख विश्वस्त सुधीर गोडसे, संदीप जगताप, शिवराज झगडे, नितीन राऊत, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे पाटील, शाम दरेकर आदींसह ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात निवेदन देत भूमिपूजनाचे कार्यक्रमस्थळ गाठत विश्वस्तांशी चर्चा केली. ज्या उद्देशासाठी जागा खरेदी केली आहे. प्राधान्याने ते रुग्णालय उभारावे, निवडणूक झाल्यानंतर ग्रामस्थ मंडळासमवेत बैठक घ्यावी त्यानंतर सर्वजण निर्णय घेऊ. विश्वस्त मंडळाने ग्रामस्थांच्या मागणीला प्रतिसाद दिल्याने संभाव्य वाद टळला. ग्रामस्थांसमवेत बैठक घेऊन निर्णय घेऊ -विश्वस्त भूमिपूजन कार्यक्रमस्थळांवर ग्रामस्थांनी धाव घेत विश्वस्त मंडळाशी चर्चा केली. यावेळी थोडी शाब्दिक चकमक झाली. परंतु हे भक्तनिवास आणि बहुउद्देशीय इमारतीबाबत निवडणूक पार पडल्यानंतर सर्वांनी बैठक घेऊन निर्णय घेण्याचे विश्वस्त मंडळाने मान्य केले, असे प्रमुख विश्वस्त मंगेश घोणे, विश्वस्त डॉ. राजेंद्र खेडेकर, पोपट खोमणे, पांडुरंग थोरवे, अनिल सौन्दडे यांनी सांगितले.