प्रभात वृत्तसेवा जेजुरी – जेजुरी नगरपरिषदेचा मतमोजणीचा निकाल जाहीर झाल्यानंतर गडाच्या पहिल्या पायरीजवळ खंडेरायाचरणी भंडारा अर्पण करून आशीर्वाद घेताना भंडाऱ्याचा भडका उडाल्याने १६ जण प्रचंड भाजले. यामध्ये निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका मोनिका राहुल घाडगे व त्यांचे पती राहुल घाडगे यांच्यासह राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित नगरसेविका स्वरूपा खोमणे आदींचा समावेश आहे. ही घटना (दि.२१) दुपारी घडली. जखमींना तातडीने येथील खासगी व सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती नियंत्रणात आणली.मल्हार नाट्यगृह येथे निकाल जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार व कार्यकर्ते खंडोबा गडाच्या पहिल्या पायरीजवळ भंडारा अर्पण करण्यासाठी गेले होते. कार्यकर्त्यांनी उधळण केलेल्या भंडाऱ्याने अचानक पेट घेतला. त्यातच स्फोटही झाला. १६ जण भाजले असून यात महिलांचा समावेश आहे. रुपाली खोमणे, विलास बारभाई, सानिका गाढवे, संस्कार गलांगे, देवल बारभाई, मनीषा चव्हाण, रजनी बारभाई, स्वप्नील लाखे, अनिल बारभाई, गणेश चव्हाण, निशा दादा भालेराव, लक्ष्मी माऊली खोमणे, मोनिका राहुल घाडगे (नवनिर्वाचित नगरसेविका), राहुल घाडगे, स्वरूपा खोमणे (नगरसेविका), उमेश भंडलकर आदींचा समावेश आहे. नगरसेविका स्वरूपा खोमणे यांना उपचार करून घरी सोडले आहे. प्रशासन व्यवस्थेने शहरवासीय, भाविकांच्या संयमाचा अंत पाहू नये, असे संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष तथा माजी विश्वस्त संदीप जगताप, शिवराज झगडे यांनी सांगितले. भेसळयुक्त भंडारा रोखण्याची गरज नवनिर्वाचित नगराध्यक्ष जयदीप बारभाई म्हणाले की, गडाच्या पहिल्या पायरीजवळ घडलेली घटना दुर्दैवी असून ज्वालाग्राही, भेसळयुक्त भंडाऱ्याने पेट घेऊन मोठा भडका उडाला. भविष्यात भेसळयुक्त भंडाऱ्याच्या विक्रीवर कडक कारवाई करण्यात येणार असून नगरपालिका याबाबत पुढील काळात कठोर पावले उचलणार आहे, असे बारभाई यांनी सांगितले.