Pune District : जेजुरी नगरपालिका निवडणुकीची मतदार यादी सदोष

जेजुरी : जेजुरी नगरपरिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीतील अंतिम मतदार यादी सदोष असून ती दुरुस्त करावी अन्यथा संभाजी ब्रिगेड सह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलनात्मक पवित्रा घेतला जाईल, अशा आशयाचे निवेदन मंगळवारी (दि. 4)नगरपरिषद प्रशासनाला देण्यात आले आहे.
जेजुरी नगरपालिका निवडणुकीची अंतिम यादी 30 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे, यामध्ये अनेक त्रुटी विशेषतः ही यादी सदोष असल्याचे संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष तसेच नगराध्यक्ष पदाचे इच्छुक उमेदवार संदीप जगताप, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष उमेश जगताप, उपाध्यक्ष माऊली राऊत यांनी नगरपालिकेला देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
यादीमध्ये जाणीवपूर्वक काही मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. प्रसिद्ध केलेल्या अंतिम यादीमध्ये बाहेरगावातील तसेच ग्रामीण भागातील मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. गेली 10वर्षाहून अधिक काळ येथे रहिवासी नसलेल्या नागरिकांची नावे असून मृत्यू झालेल्या व्यक्तींचीसुद्धा नावे कमी करण्यात आलेली नाहीत. ग्रामीण भागासह शहरात काही व्यक्तींची दुबार नावे आहेत.
नोकरी उद्योग व्यवसाया निमित्त शहरात रहिवासी असलेले तसेच परप्रांतीय व्यक्ती यांचे घर नंबर, मतदार यादीमध्ये आहेत तो कोणाचा भाडेकरू आहे? घरमालकाचे नाव, आधारकार्ड, रेशनिंग कार्ड आदी बाबत नगरपालिकेकडून सर्व्हेक्षण व्हायला हवे होतेय मात्र ते सर्वेक्षण संशयाच्या भोवर्यात येते आहे. गेली अनेक वर्षापासून जेजुरीत वास्तव्यास नसलेली तसेच काही परप्रांतीय व्यक्तीची नावे यादीमध्ये समाविष्ट आहेत तसेच मतदार यादीमध्ये काही मतदारांचे घर क्रमांक शून्य दाखवला आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित करीत मतदार यादी सदोष असून मतदानापूर्वी दुरुस्त करावी अन्यथा आंदोलन करावे लागेल असा इशारा निवेदनामध्ये देण्यात आला आहे.





