जेजुरी- जेजुरी शहर व औद्योगिक वसाहतीमधील कामगार, बेरोजगार, गरजूंना श्री मार्तंड देवसंस्थानकडून अन्नसेवा, जीवनावश्यक किराणा मालाचे किट उपलब्ध करून देण्यात येत आहे. आजतागत सुमारे 2 हजार नागरिकांना दोन्ही वेळ सुविधा पुरविण्यात येत आहे. भरीव कामाला हातभार लावण्यासाठी मार्तंड देवसंस्थानचे विश्वस्त तुषार भिवाजी सहाणे यांनी 1 लाख 11 हजार रुपये मदत केली आहे. ही रक्कम जेजुरी परिसरातील गोरगरीब, कष्टकरी, बेरोजगार, औद्योगिक वसाहतीमधील परप्रांतीय कामगारांच्या अन्नसेवेसाठी वापरण्यात यावी, असे त्यांनी बैठकीत सांगितले. पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांच्या प्रयत्नातून श्रीक्षेत्र नारायणपूर देवसंस्थानकडून 2 हजार किलो तांदूळ उपलब्ध झाला आहे.
शहरातील अनेक सामाजिक संस्था तसेच उघडा मारुती मित्र मंडळाकडून ही अन्नसेवा पुरविण्यात येत आहे. सध्या देवसंस्थानवर अन्नसेवा पुरविण्याचा मोठा ताण पडत आहे. उद्योजक, ठेकेदार, कारखानदार यांनी मदतीचा हात देण्याची गरज असल्याचे प्रमुख विश्वस्त संदीप जगताप यांनी सांगितले. देवसंस्थानकडून सर्व कर्मचारी, पोलीस, डॉक्टर, पत्रकार, आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना एन. 95 क्रमांकाच्या सुमारे 200 मास्कचे वाटप करण्यात आले आहे.