Jejuri Forest Fire – पिंगोरी (ता.पुरंदर) परिसरात डोंगराला भीषण वणवा लागून सुमारे दीड हजार एकरांवरील वनसंपदा जळून खाक झाली आहे. या आगीत शेतकऱ्याचा जनावरांसाठी साठवून ठेवलेला कडबा देखील जळून नष्ट झाला असून सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. पिंगोरी परिसरातील डोंगररांगांमध्ये लागलेल्या या वणव्याने काही तासांतच विक्राळ रूप धारण केले. पिंगोरीचे पोलीस पाटील व सरपंच यांनी दिलेल्या माहितीनुसार, वनविभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र, सुसाट्याचा वारा व जंगलांमध्ये वाळलेले गवत मोठ्या प्रमाणावर असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. यामध्ये मोठ्या प्रमाणात वनसंपदा आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती. हा संपूर्ण भाग जेजुरीच्या खंडोबा मंदिरालगतचा असून, दरवर्षी भाविकांच्या निष्काळजीपणामुळे अशा प्रकारचे वनवे लागतात, अशी माहिती पोलीस पाटील राहुल शिंदे यांनी दिली. वनविभागाच्या माहितीनुसार, गुरुवार (दि.१६) सायंकाळी पाच वाजलेच्या सुमारस सुरुवातीला साकुर्डे हद्दीत खाजगी डोंगररानाला आग लागली होती. खंडोबा मंदिर. जेजुरी ही आग शासकीय वनक्षेत्रात पसरण्याची शक्यता लक्षात घेऊन तातडीने नियंत्रण मिळवण्यात आली. मात्र, त्यानंतर कवडेवाडी परिसरात, खंडोबा मंदिरालगतच्या डोंगर भागातही आग लागल्याचे निदर्शनास आले. वनविभागाने शुक्रवार (दि.१७) सायंकाळी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. दरम्यान, कवडेवाडी येथील शेतकरी भरत यादव व मारुती यादव यांच्या शेतातील सुमारे दोन हजार कडब्याची गंज जळून खाक झाली. जनावरांसाठी साठवलेला हा चारा नष्ट झाल्याने सुमारे एक लाख पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. पिंगोरीचे तलाठी बोबडे यांनी घटनास्थळी पंचनामा करून शासकीय मदतीसाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले. उन्हाळा सुरू होताच अशा वणव्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. दोन दिवसांपूर्वी पिंगोरी येथील तुकाईनगर येथेही वणवा लागला होता. मात्र, ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे तो वेळीच विझवण्यात आला होता. “पिंगोरी परिसरात वणवा लागू नये यासाठी जनजागृती केली जाते. मात्र, प्रवाशांच्या निष्काळजीपणामुळे आगीच्या घटना घडतात. ग्रामपंचायतीकडे आग विझवण्याची साधने नसल्याने शासनाने ग्रामीण भागात यंत्रणा उपलब्ध करून द्यावी.” – संदीप यादव, सरपंच, पिंगोरी “दरवर्षी भाविक किंवा प्रवाशांकडून निष्काळजीपणे टाकलेल्या पेटत्या काड्यांमुळे वणवे लागतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचे नुकसान होत आहे. त्याचा बरोबर शासकीय आणि स्थानिक यंत्रणावर त्याचा मोठा तणाव वाढला आहे.” – राहुल शिंदे, पोलीस पाटील, पिंगोरी