प्रभात वृत्तसेवा सासवड – पुणे जिल्ह्यातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जेजुरी शहरात वर्षभर मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात. त्यामुळे नागरिकांसह येणाऱ्या भाविकांसाठी वाढत्या सुविधांची गरज अधोरेखित होत आहे. या पार्श्वभूमीवर जेजुरीच्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवणार असल्याचे भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन सोनवणे यांनी प्रचारसभेत सांगितले. सोनवणे म्हणाले की, जेजुरीतील पेशवे तलावाला आता नव्या स्वरूपात साठवण तलाव म्हणून विकसित केले जाणार आहे. यासाठी पावसाळ्यात वीर धरणातून वाहून जाणारे पाणी याच तलावात वळवून वर्षभर पुरेल इतका साठा केला जाणार आहे. वीर धरणातून पाणीपुरवठ्याची नवीन योजना मंजूर झाली असून तिच्या टेंडर प्रक्रियेची पूर्तता झाल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुकीनंतर हे काम तातडीने सुरू करून जेजुरीचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.जेजुरीच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून शहराच्या वाढीव हद्दीचा प्रस्तावही तयार केला आहे. लवथळेश्वर, विद्यानगर, कडेपठपाईथा, रेल्वे स्टेशन परिसर अशा पाच महत्त्वाच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा सुविधांची उभारणी केली जाणार असल्याचे सोनवणे यांनी स्पष्ट केले. भाजपाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन सोनवणे यांच्यासह सोनाली चौंडकर, नरेंद्र पवार, ॲड. दीप्ती जोशी, ईश्वर दरेकर, विना सोनवणे, सागर हरपळे, अनिकेत भालेराव, रोहिणी बारसुडे, वर्षा कोशे, सदानंद बारबाई, जयदीप भापकर, प्रज्ञा कांबळे, कुमार गावडे, गणेश डोंबे, प्रियंका देशमुख, धनंजय गोडसे, अलका शिंदे, काजल दोडके, गणेश शिंदे या उमेदवारांच्या समर्थनार्थ भव्य पदयात्रा आणि सभा मोठ्या उत्साहात पार पडली. मूलभूत सुविधा उभारल्या सचिन सोनवणे यांनी यापूर्वीच्या कार्यकाळाचा आढावा घेताना म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली शहरात मोठ्या प्रमाणावर मूलभूत सुविधा उभारण्यात आल्या. झोपडपट्टी भागांमध्ये बंदिस्त गटारे, लाईट, पाण्याच्या लाईन्स अशी आवश्यक कामे पूर्ण करण्यात आली. नाझरे धरणावरून येणाऱ्या पिण्याच्या पाइपलाइनचे कामही मार्गी लावण्यात आले होते. नाझरे धरणात 70 एचपीच्या तीन मोटारी बसवून पाणी पंपिंग स्टेशनपर्यंत उचलून देण्याची योजना यशस्वीरित्या राबवली. जेजुरी शहरात आधुनिक सुविधांनी सज्ज असे मल्हार नाट्यगृह उभारण्यात आले आहे.