प्रभात वृत्तसेवा पुणे – जेजुरी नगरपरिषदेत 8 वर्षांपासून सत्ताधाऱ्यांनी विविध विकासकामांमध्ये केलेला भ्रष्टाचार पुराव्यानिशी दाखवून देणार आहे. सत्ताधाऱ्यांनी नगरपरिषद हे भ्रष्टाचाराचे केंद्र बनविले होते. आज सत्ताधाऱ्यांना जनता नाकारत असून जेजुरीच्या जनतेने माझी उमेदवारी जाहीर केली असून जेजुरी नगरपरिषदेच्या पारदर्शक कारभारासाठी मी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयदीप दिलीपभाई बारभाई यांनी दिली. जेजुरी नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रचारास सुरुवात छाननी पूर्ण झाल्यानंतर करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उमेदवारी मिळालेल्या उमेदवारांनी प्रभागात मतदारांची भेटीगाठी घेण्यासाठी सुरुवात केली आहे. नगराध्यक्षपदाचे उमेदवार जयदीप बारभाई हे सर्व 10 प्रभागांत उमेदवारांसमवेत जात मतदारांच्या गाठीभेटी घेऊन संवाद साधत आहेत. नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या नगराध्यक्षपदाचे आणि नगरसेवक पदासाठीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ देवसंस्थाननचे माजी प्रमुख विश्वस्त संदीप जगताप यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला. यावेळी जेजुरीकरांची लक्षणीय गर्दी, विशेषतः महिलांची मोठी उपस्थिती होती. यावेळी कार्यकर्त्यांनी जयदीप बारभाई यांना पाठिंबा दर्शवला. यावेळी माजी नगराध्यक्षा ज्ञानेश्वरी बारभाई, माजी नगरसेवक रमेश बयास, एन. डी. जगताप, रोहिदास कुंभार, सामाजिक कार्यकर्ते सचिन खोमणे, शैलेंद्र राऊत, जालिंदर खोमणे, विना बारभाई, सतीश कुदळे, अशोक खोमणे, उमेदवार, पदाधिकारी उपस्थित होते. प्रचारास सुरूवात झाल्याने निवडणुकीत रंगत आली आहे. यावेळी जयदीप बारभाई, भक्ती रवींद्र भट्टी, योगेश रोहिदास जगताप, प्रज्ञा पंकज राऊत, स्वप्नील सुरेश हरपळे, अमिना मेहबूब पानसरे, मनोज शशिकांत दरेकर, स्नेहल गौतम भालेराव, मेघा सत्यवान उबाळे, स्वरूपा जालिंदर खोमणे,यांनी सर्व प्रभागांतील मतदारांच्या भेटी घेऊन समस्या अडीअडचणी जाणून घेतल्या.