पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस हा केंद्र व राज्य सरकारमध्ये सत्तेत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून जेजुरी शहरासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. पालखी महामार्ग, रस्ते, पाणीपुरवठा, शहर सुशोभीकरण, बागबगीचा पार्किंग, आदी कामे पूर्ण केली जातील. पर्वत योजनेत रोप वेचा समावेश करून जेजुरीत उभारणार आहे. जेजुरी शहर हे स्मार्ट सिटी करणार आहे. जेजुरी शहरातील सोयी- सुविधा शाश्वत विकास करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाच्या उमेदवारांना साथ द्यावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. जेजुरी नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन जेजुरी शहरात करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सभेसाठी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांबरोबर मतदारांनी गर्दी केली होती. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. नगराध्यक्ष पदासाठी जयदीप बारभाईं यांना देवस्थान माजी विश्वस्त संदीप जगताप, संतोष खोमणे, माजी नगराध्यक्ष गणेश निकुडे, रोहिदास कुंभार, शहराध्यक्ष रमेश लेंडे यांनी पाठिंबा देत जेजुरी नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाच्या वतीने उमेदवारी विविध अठरापगड जाती धर्माचे लोक यांना देत सर्व समाज बांधवांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. उमेदवारी देताना अनुभव, पक्षाची ध्येय धोरणे, जेजुरीच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चांगले काम करावे. पवार म्हणाले की, शब्दाला पक्का आहे, जे बोलतो ते करतो. लबाडी, खोटारडेपणा करत नाही. एखादे काम होणार नसेल तर स्पष्ट सांगतो. आम्ही सर्व शैक्षणिक, आर्थिक, सहकारी संस्था चांगल्या प्रकारे चालवितो. उद्योजक कंपन्यांकडून सीएसआर फंड उपलब्ध करून देण्यात येईल. पाणीपुरवठा योजना मंजूर करून दिली. परंतु अजूनही अपूर्ण आहे. जेजुरीला कचराकुंडी मुक्त करण्यासाठी बायोमायनिंग प्रकल्प राबविण्यात येईल. भव्य वाहनतळाची सुविधा उभारणार आहे. जेजुरी नगरपरिषद भ्रष्टाचारमुक्त आणि भयमुक्त करणार आहे. जेजुरीत येऊन कोणी दमदाटी केली तर खपवून घेणार नाही जसास तसे उत्तर देणार आहे, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयदीप बारभाईं यांनी जेजुरी नगरपरिषदेतील भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी मतदारांनी साथ द्यावी. शहरातील सोयी- सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी मतदारांना साद घातली. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामथे, तालुकाध्यक्ष उत्तम धुमाळ, जेजुरीचे ज्येष्ठ नेते, माजी नगराध्यक्ष दिलीप बारभाई, माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे, पदाधिकारी, राष्ट्रवादीचे उमेदवार उपस्थित होते. जेजुरीतील पाणीटंचाई मिटवू- पवार पवार म्हणाले की, सोन्याची जेजुरी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला जाईल. जेजुरीत कोणी सांगायला येताना प्रत्येकाने लक्षात ठेवावे की, आपले शहर कसे आहे. कोणत्या सुविधा दिल्या आहेत. हे पहावे. मग सांगितले पाहिजे. मी बारामतीत सुविधा देतो, तशा सुविधा दिल्या पाहिजेत. काही वर्षांत प्रचंड विकसित होणारा हा पुरंदर तालुका आहे. पुरंदर विमानतळामुळे तालुक्याचा विकास होणार आहे. त्यामुळे नागरिकांचे जीवनमान उंचावले जाईल. मतदारांनी जात पात धर्म यांचा विचार न करता सर्वांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना साथ द्यावी. मी अल्पसंख्यांक समाजाला प्रतिनिधीत्व दिले आहे. जेजुरीच्या पाण्यासाठी वणवण भटकंती थांबविली जाईल, अशी ग्वाही त्यांनी जेजुरीकरांना दिली. कोणी सांगितले तर ऐकू नका पवार म्हणाले, भ्रष्ट्राचार झाल्यावर विकास कसा होणार, असा सवाल करीत त्यांनी सत्ताधारी गटाचे चिमटे काढले. जेजुरीत कोणी येऊन काय सांगितले तर ऐकू नका. राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावे. मी जेजुरीतूनच बारामतीला जातो. त्यामुळे जेजुरीत थांबल्याशिवाय जाणार नाही. त्यामुळे मी शब्द देतो. माझ्या लाडक्या बहीणी आणि सर्व उमेदवारांना निवडून द्यावे. जे निवडणुकीसाठी थांबले. त्यांना स्वीकृत नगरसेवक करणार आहे.