Jeffrey Epstein Files – जेफ्री एपस्टीनशी संबंधित जी कागदपत्रे अमेरिकेच्या न्याय विभागाने प्रसिद्ध केली आहेत, त्यातून किमान १६ फायली गायब झाल्या आहेत, यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे काही फोटोही गायब झाले आहेत. ही कागदपत्रे वेबसाईटवर प्रसिद्ध होण्याच्या दुसऱ्याच दिवशी कोणतेही स्पष्टिकरण न देता या १६ फायली वेबसाईटवरून हटवण्यात आल्या आहेत. गायब झालेल्या फायली शुक्रवारी दिसत होत्या. मात्र शनिवारी अचानक गायब झाल्या. या फायलींमध्ये महिलांची काही तैलचित्रे, फोटो आणि हे फोटो काढणाऱ्यांची माहिती होती. याशिवाय ट्रम्प, मेलानिया ट्रम्प यांचे एपस्टीन आणि एपस्टीनच्या दीर्घकाळच्या सहकारी घिसलेन मॅक्सवेल यांच्याबरोबरचे फोटो देखील वेबसाईटवरून हटवण्यात आले आहेत. यात जेफ्री एपस्टीनच्या लैंगिक गुन्ह्यातील काही पीडीत महिलांच्या एफबीआयने घेतलेल्या मुलाखती आणि न्याय विभागाने ठपका ठेवलेल्या व्यक्तींविरोधातील अंतर्गत न्यायविभागाच्या मेमोंचाही समावेश आहे. एपस्टीन याचे अनेक महत्वपूर्ण व्यक्तींबरोबरचे संबंध दर्शवणारी कागदपत्रेच या वेबसाईटवरून गायब झाल्याने ही कागदपत्रे उघड करण्यामागील नेमका हेतूच व्यर्थ झाल्याची बावना व्यक्त होऊ लागली आहे. मात्र या फायली का हटवण्यात आल्या, याचे कोणतेही स्पष्टिकरण न्याय विभागाच्यावतीने दिले गेलेले नाही. या फायली जाणीवपूर्वक हटवल्या गेल्या का, याचे उत्तर देखील न्याय विभागाच्या प्रवक्त्याकडून मिळू शकलेले नाही.