जे नेमे माझ्या गात विठोबासी ।।

Updated On:

 

धन्य ते सभाग्य नर आणि नारी।
करिताती वारी पंढरीची ।।
तयांचे चरणी माझे दंडवत ।
जे नेमे माझ्या गात विठोबासी ।।
दिवाळी दसरा अवघे पर्वकाळ ।
नांदती सकळ तया घरी ।।

संत चोखोबांचा अभंगाचा अनुभव वारीमार्गावरील विसाव्याची आणि मुक्कामाची ठिकाणे “याचि देही, याचि डोळा’ घेत असतात. देव दर्शनाला आपण जातो; पण देव आपल्याला भेटायला येतात, ही भावना प्रत्येक वारकऱ्याच्या, त्या मार्गावरील प्रत्येक ग्रामस्थाच्या मनात असते.
या सोहळ्यांत तीन विसाव्याची ठिकाणं आणि एक मुक्कामाचे ठिकाण असते. संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराजांचा पालखी सोहळा पुणे-सातारा-सोलापूर अशा तीन जिल्ह्यांतून मार्गक्रमण करीत असतो, तर जगद्‌गुरू तुकाराम महाराजांचा सोहळा पुणे आणि सोलापूर या दोन जिल्ह्यांतून पंढरपूरला जातो. या अठरा दिवसांच्या कालावधीत या दोन्ही पालखी सोहळ्यांच्या मार्गावर अक्षरशः दिवाळी-दसरा असल्यासारखे चित्र असते.

या दोन्ही सोहळ्यांत एकच गोष्ट महत्त्वाची असते आणि ती म्हणजे देवाचे आगमन, स्वागत, पूजा-दर्शन आणि निरोप. भावभोळ्या भक्तांच्या मनात या संतांबद्दल आणि पांडुरंगाबद्दल असलेल्या भावभक्तीचे हे निराकार रूप असते. सडा-रांगोळ्यांनी घातलेल्या पायघड्या, फटाक्‍यांची आतषबाजी, विसावा किंवा मुक्कामाच्या ठिकाणी केलेली फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई हे येथील सर्वच वातावरण पवित्र करून जाते. विसाव्याच्या ठिकाणी माऊली-तुकोबा अक्षरशः अर्धा तासापेक्षा अधिक काळ थांबत नाहीत, मुक्कामाच्या ठिकाणी दर्शनाला असणारी गर्दी आणि सर्व षोडषोपचार यामध्ये गावातील वातावरण संतांच्या पदस्पर्शाने पावन होत असते.

या दरम्यान घराघरांत वारीची परंपरा असलेल्या अनेक ठिकाणी पुरणाचा नैवेद्य केला जातो. अगदी पादुकांच्या ठिकाणी जाऊन तो दाखवला जाणे शक्‍य नसले तरी घरातच पांडुरंगाच्या फोटोसमोर किंवा मूतीसमोर हा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. या मार्गावर अनेक ठिकाणी येथील ग्रामदैवतांच्या परिसरात यात्रेचे स्वरूप आलेले असते.मुळात हा सोहळा म्हणजे गावांच्या दृष्टीने एक जत्राच असते; पण ही जत्रा भक्तिरसात फुललेली असते.

गावाचे अर्थकारणही या सोहळ्यात काही अंशी का होईना उलाढालींच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. फुलांच्या-तुळशीच्या माळांना असलेली मागणी, खोबरे- साखरफुटाणे-चुरमुरे-बत्तासे यांची प्रसादाची पाकिटे, रेवड्या-गोडी शेव याबरोबरच भजी-वडापाव किंवा आता अलीकडच्या काळात दाक्षिणात्य डोसा-इडलीसारख्या पदार्थांनी सजलेली दुकाने किंवा हातगाड्या आणि बाजारपेठा… येथे होणारी वारकऱ्यांची आणि त्याचबरोबर ग्रामस्थांची गर्दी एका वेगळ्या अर्थकारणाचा मागोवा देऊन जातात.

माऊली-तुकोबा आपल्या गावात येणार… यासाठी ग्रामस्वच्छता, त्यानिमित्ताने होणारे वृक्षलागवडीसारखे उपक्रम आणि दिंड्यांच्या मानकऱ्यांचे होणारे सन्मान या सर्व गोष्टींसाठी कमी वेळेत अधिकाधिक उपक्रम राबवण्यासाठी कार्यकर्त्यांची होत असलेली धावपळ गावासाठी चैतन्यमय ठरते. वारी मार्ग टाळ-मृदंगाच्या ताला-सुरात दंग झालेला असतो. विठ्ठलनामाचा प्रेमभावाने केलेला “टाहो’ या मार्गावर दुमदुमत असतो.

विठ्ठल आवडी प्रेमे भाव हो..
विठ्ठल नामाचा रे टाहो
प्रेम भाव, विठ्ठल आवडी प्रेमे भाव ।।धृ।।
तुटला हा संदेह भव मूळ व्याधेचा,
भव मूळ व्याधेचा, विठ्ठल नामाचा ।।1।।
म्हणा नरहरी उच्चार, कृष्ण हरी श्रीधर,
हेची नामा आम्हा सार, म्हणा नर हरी
संसार तरावया संसार तरावया,
प्रेमे भव विठ्ठल आवडी ।।2 ।।

संत श्री नरहरी महाराजांचा हा अभंग या वारी सोहळ्यातील नामाचा महिमा आणि पवित्रता दाखवून देतो. या सोहळ्यात चैतन्य आहे, पावित्र्य आहे आणि संतांबरोबर देवालाही उरी भेटण्याची आस आहे आणि त्याचमुळे पायी प्रवास मार्गावर दसरा-दिवाळी सुरू असल्याचे चित्र असतो. या गावांमधील लग्न होऊन सासरी गेलेल्या महिला एकवेळ दिवाळाली माहेरी येत नाहीत; मात्र पालखी सोहळ्याला जरूर येतात. असा प्रेम-भक्तीचा सोहळा आहे.

आणखी संबंधित बातम्या

Indrayani River: प्रशासनाला जमले नाही; पावसाने स्वच्छ केली इंद्रायणी.....

2026-07-08 08:09:10

Indrayani River: प्रशासनाला जमले नाही; पावसाने स्वच्छ केली इंद्रायणी.....

Alandi Flood News : इंद्रायणीला महापूर..! आळंदीत अडकलेल्या ४०८ वारकऱ्यांची सुरक्षित सुटका, मंदिर परिसरात पाणी

2026-07-06 16:20:56

Alandi Flood News : इंद्रायणीला महापूर..! आळंदीत अडकलेल्या ४०८ वारकऱ्यांची सुरक्षित सुटका, मंदिर परिसरात पाणी

Ashadhi Wari 2026 : वारकऱ्यांनो... देहू-आळंदीला जाऊ नका.! पालखी सोहळ्याबाबत प्रशासनाचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर...

2026-07-06 15:57:12

Ashadhi Wari 2026 : वारकऱ्यांनो... देहू-आळंदीला जाऊ नका.! पालखी सोहळ्याबाबत प्रशासनाचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर...

Alandi News : इंद्रायणीला पूर; आळंदीकडे येऊ नका, प्रशासनाचे वारकऱ्यांना आवाहन

2026-07-06 12:11:37

Alandi News : इंद्रायणीला पूर; आळंदीकडे येऊ नका, प्रशासनाचे वारकऱ्यांना आवाहन

Ashadhi Wari : पालखी सोहळ्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांकडून स्वयंसेवक नोंदणी; 6 व 7 जुलैला प्रशिक्षण

2026-07-04 22:03:08

Ashadhi Wari : पालखी सोहळ्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांकडून स्वयंसेवक नोंदणी; 6 व 7 जुलैला प्रशिक्षण