Jaykumar Gore : मंत्री जयकुमार गोरे ॲक्शन मोडमध्ये; वारीच्या पूर्वतयारीचा घेतला सविस्तर आढावा
मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी आज धर्मपुरी, पुरंदावडे, नातेपुते, माळशिरस, सदाशिवनगर, वेळापूर व भंडी शेगाव, वाखरी येथील पालखी मुक्काम, विसावा व रिंगणाच्या ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी केली.

Jaykumar Gore : आषाढी वारी २०२६ च्या अनुषंगाने दि. १९ जुलै २०२६ रोजी श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी येथे आगमन होत आहे. पालखी समवेत लाखो वारकरी भाविक पायी येतात. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी आज धर्मपुरी, पुरंदावडे, नातेपुते, माळशिरस, सदाशिवनगर, वेळापूर व भंडी शेगाव, वाखरी येथील पालखी मुक्काम, विसावा व रिंगणाच्या ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी शासन व प्रशासनाच्या वतीने वारकरी-भाविकांसाठी उभारण्यात आलेल्या जर्मन हँगर, वॉटरप्रूफ मंडप, फिरती शौचालये व पिण्याच्या पाण्याच्या टँकर व्यवस्थेची पालकमंत्र्यांनी (Jaykumar Gore) माहिती घेतली. तसेच आरोग्य विभागाच्या वतीने सर्व ठिकाणी वारकऱ्यांसाठी देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधा तसेच औषधे याचीही माहिती घेतली. त्यांनी प्रत्येक ठिकाणाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या. मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्रातील विविध सुविधांची माहिती त्यांनी घेतली.
पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या लाखो वारकऱ्यांना पालखी मार्गावर तसेच विसावा, मुक्काम व रिंगणाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही, या दृष्टीने नियुक्त केलेल्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी परस्परांत समन्वय ठेवून काम करावे, अशा सूचना पालकमंत्री गोरे (Jaykumar Gore) यांनी दिल्या.स्वच्छता, आरोग्य सुविधा, वाहतूक नियोजन व सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
या पाहणी दौऱ्यावेळी आमदार उत्तम जानकर, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, माळशिरसच्या उपविभागीय अधिकारी विजया पांगरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत सूर्यकांत भुजबळ, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, तहसीलदार सुरेश शेजुळ, पंढरपूर उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, तहसीलदार, कार्यकारी अभियंता अमित निमकर, सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्यासह संबंधित ठिकाणचे स्थानिक अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.






