Pratik Patil: जयंत पाटील यांचा मुलगा ‘या’ मतदारसंघातून लढणार लोकसभा निवडणूक, काय सुरु आहे चर्चा?

Pratik Patil: महाराष्ट्रात शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी आढावा बैठका घेत आहे. दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदारसंघातून संभाव्य उमेदवार म्हणून राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचा मोठा मुलगा प्रतीक पाटील यांच्या नावाची चर्चा आहे.
प्रतीक पाटील यांचे वय 33 वर्ष असून ते सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहेत. त्यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले की, स्थानिक राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी या जागेवरून त्यांची (प्रतिक पाटील) उमेदवारी मागितली होती. पण ‘बैठकीत पुढे काय झाले, याची मला माहिती नाही.’
हातकणंगले मतदारसंघ हा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या मध्ये पसरलेला आहे. सध्या शिवसेनेतील एकनाथ शिंदे गटाचे धैर्यशील माने येथील खासदार आहेत. माने यांनी शेतकरी नेते राजू शेट्टी यांचा पराभव केला होता.
गेल्या चार ते पाच वर्षांपासून, प्रतिक पाटील हे वडिलांनी प्रतिनिधित्व केलेल्या इस्लामपूर विधानसभा जागेवर सक्रियपणे काम करत आहेत. या मतदारसंघाला पूर्वी वाळवा म्हटले जात असे. जयंत पाटील यांचे वडील राजारामबापू यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. साखर कारखानदारी, सहकारी संस्था आणि शैक्षणिक संस्थांसह, ऊसशेती आणि दुग्धोद्योगासाठी ओळखला जाणारा हा विधानसभा मतदारसंघ पाटील कुटुंबाचा मजबूत बालेकिल्ला आहे.
घराणेशाहीच्या राजकारणाच्या आरोपांवर प्रतीक पाटील काय म्हणाले?
विरोधी पक्षनेत्यांनी राष्ट्रवादीवर लावलेल्या घराणेशाहीच्या आरोपांवर प्रतीक म्हणाले, “माझ्या आजोबांचे निधन झाले तेव्हा माझे वडील अमेरिकेत होते. जेव्हा ते परतले तेव्हा त्यांनी सर्व कामे पूर्ण केली आणि ते पुन्हा अमेरिकेत परतणार होते, परंतु स्थानिक कार्यकर्त्यांनी आग्रह धरला की त्यांनी येथेच थांबावे आणि अपूर्ण कामे पूर्ण करावीत.
अजित पवार यांनी भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) सरकारशी हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादीत फूट पडली असेल, पण मैदानावरील कार्यकर्ते अजूनही शरद पवार यांच्यासोबत आहेत. तळागाळातील कार्यकर्त्यांवर बरेच काही अवलंबून आहे. शरद पवारांनी काय काम केले हे त्यांना माहीत आहे आणि त्यांचे त्यांच्याशी असलेले संबंध अजूनही दृढ आहेत.
राजकीय महत्त्वाकांक्षेबद्दल विचारले असता प्रतीक म्हणाले की, मला लोकांशी संपर्क साधण्यात आणि गरिबी निर्मूलनासाठी काम करण्यात अधिक रस आहे. एका बैठकीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मला हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची मागणी केली. मला फक्त एवढेच माहीत आहे. दरम्यान, हातकणंगले येथून कोणाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवायचे याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र राष्ट्रवादी काॅंग्रेस प्रतीक पाटील यांना येथून लोकसभेसाठी उभे करणार का हे पहावे लागणार आहे.




