Jayant Patil : यावर्षी म्हणजेच 3 मे 2026 रोजी घेण्यात आलेली नीट परीक्षा रद्द करण्यात आली. यामुळे डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे. एनटीएकडून परीक्षाच रद्द करण्यात आल्यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. या परिक्षेची जबाबदारी असलेल्या एनटीए प्रमुखांना अशा चुकांसाठी बक्षीस दिले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी(शप) पक्षाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला आहे. पाटील (Jayant Patil) म्हणाले, यापूर्वी 2024 साली देखील पेपर फुटला होता. महत्वाच्या परीक्षांचे पेपर वारंवार फुटतातच कसे? विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांवर आतापर्यंत काय कारवाई झाली? एनटीएचे डीजी असणाऱ्या आयएएस सुबोध कुमार सिंह यांना तात्पुरते पदावरून काढले गेले. पण, नंतर लगेच त्यांना स्टील मंत्रालयात रुजू करण्यात आले आणि आता ते छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी आहेत. Jayant Patil म्हणजे ही जी यंत्रणा चुक करते, काही पैशांसाठी लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा जुगार करते, त्यांना बक्षिसे मिळतात पण विद्यार्थ्यांना आणि पालकांना काय मिळते? असा सवाल पाटील यांनी केला आहे. त्यांनी नीट परीक्षेवर संतप्त प्रतिक्रिया देत हे वारंवार घडत असल्याचे म्हटले. तसेच, भविष्यात डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणारे विद्यार्थी दहावीचा निकाल लागताच या परीक्षेच्या तयारीला लागतात. सलग दोन वर्ष मेहनत करून बारावीच्या परीक्षेनंतर विद्यार्थी लगेच ही परीक्षा देतात. पण यंदाचा पेपर फुटल्याने विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. आता ही परीक्षा नव्याने घेण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा या परीक्षेची तयारी करावी लागेल. यात विद्यार्थ्यांना मानसिक त्रास तर आहेच पण त्यासोबतच पालकांनाही त्रास सहन करावा लागणार आहे. प्रश्न फक्त पेपर फुटीचा नाही, तर शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाचा आहे, असे म्हणत त्यांनी शिक्षण व्यवस्था आणि एनटीएच्या (Jayant Patil) कामकाजावर प्रश्न उपस्थित केले.