Jayant Patil : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्याबाबत पुन्हा एकदा मोठ्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. अजित पवारांच्या निधनापूर्वीच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्र येण्याबाबत हालचाली सुरू होत्या, याची कबुली आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे वरिष्ठ नेते जयंत पाटील यांनी दिली आहे. जयंत पाटील यांनी केलेल्या खुलाशानंतर दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनीकरण केवळ राजकीय कारणांमुळे नव्हे, तर निवडणूक प्रक्रियेमुळे रखडले होते, हे समोर आले आहे. ‘दोन्ही राष्ट्रवादी आधीच एकत्र आल्या असत्या, पण…’ एका मराठी वृत्तवाहिनीला बोलताना जयंत पाटील म्हणाले, “मी, अजित पवार, शशिकांत शिंदे आणि इतर काही नेते एका बैठकीसाठी एकत्र आलो होतो. सुनील तटकरे यांनाही बोलावण्यात आले होते, मात्र काही कारणामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत. या बैठकीत विलिनीकरणाबाबत सविस्तर चर्चा झाली आणि लवकरात लवकर निर्णय घ्यावा, यावर सर्वांची सहमती होती.” ते पुढे म्हणाले, “दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस याआधीच एकत्र आल्या असत्या. मात्र निवडणूक आयोगाने आधी नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर केल्या, त्यानंतर महापालिका आणि लगेचच जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची घोषणा झाली. त्यामुळे विलिनीकरणासाठी आवश्यक असलेला वेळच मिळू शकला नाही.” निवडणूक आयोगाशीही थेट बोलणं जयंत पाटील यांनी आणखी एक महत्त्वाचा खुलासा करत सांगितले की, “त्यावेळी निवडणूक आयोगातील एका अधिकाऱ्याशी माझं बोलणं झालं होतं. विलिनीकरणासाठी आम्हाला किमान चार दिवसांचा वेळ द्यावा आणि त्यानंतर जिल्हा परिषद निवडणूक जाहीर करावी, अशी विनंती आम्ही केली होती. मात्र ते शक्य झालं नाही. का झालं नाही, यावर बोलणं सध्या योग्य ठरणार नाही.” जिल्हा परिषद निवडणुकीनंतर घोषणा ठरली होती जयंत पाटील यांनी सांगितले की, “जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची औपचारिक घोषणा करायची, असा निर्णय झाला होता. त्यानंतर शरद पवार यांच्या निवासस्थानी पुन्हा बैठक झाली आणि विलिनीकरणावर एकमत झाले.” ते पुढे म्हणाले, “5 फेब्रुवारी आणि 7 फेब्रुवारी रोजी मतदान असल्याने 8 फेब्रुवारीला घोषणा करायची असे ठरले होते. मात्र त्या दिवशी मी उपलब्ध नव्हतो, त्यामुळे 12 फेब्रुवारीला घोषणा करण्याचा विचार झाला होता.” अजित पवारांच्या निधनानंतर चर्चांना पुन्हा उधाण दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्र येणार का, यावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. जयंत पाटील यांच्या या खुलाशामुळे विलिनीकरणाबाबतचे पडद्यामागचे प्रयत्न पहिल्यांदाच उघडकीस आले असून, राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.