जयंत पाटीलांनी सरकारला विचारला प्रश्न,’झाडे पडत नाही पण पुतळा कसा पडतो ? जयदीप आपटेचा पत्ता कुणी दिला?

Jayant Patil । सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावर बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी कोसळला. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक शिवप्रेमींनी संताप व्यक्त करत आहे. या घटनेनंतर ठिकठिकाणी मोर्चे आणि निषेध आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे हा पुतळा उभारून फक्त 8 महिने झाले होते.
आज मालवणमध्ये महाविकास आघाडी आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत. यादरम्यान ठाकरे आणि राणे यांचे कार्यकर्ते आपापसात भिडले. पोलिसांकडून यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणत दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला जात होता. यादरम्यान आदित्य ठाकरे २ तासानंतर किल्ल्याबाहेर निघाले. यावेळी आदित्य ठाकरे जयंत पाटील विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी जयंत पाटील यांनी अनेक मुद्द्यांवरून सरकारला घेरले. ते म्हणाले,’फक्त आठ महिन्यांपूर्वी बांधलेला राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला. हा पुतळा पडला नसून महाराष्ट्राचा स्वाभिमान पडला आहे. मुख्यमंत्री म्हणतात प्रचंड वेगाने वारे वाहत होते. त्यामुळे पुतळा पडला. तसे असते तर दोन-तीन झाड पडली असती पण तसे न होता फक्त पुतळा पडला याचा अर्थ पुतळ्याच काम सदोष होते. अपरिपक्व माणसाला पुतळ्याचे काम दिले. दीड-दोन फुटांचे पुतळे तयार करणाऱ्या व्यक्तीला ३५ फुटाच्या पुतळ्याचे काम दिले, अशीही टीका पाटील यांनी केली.
जयंत पाटील पुढे म्हणाले,’झाडे पडली नाही पण पुतळा पडला हा पुतळा भ्रष्टाचारामुळेच पडला आहे. देशामध्ये अनेक वर्षांपासून मोठमोठे पुतळे उभे आहेत ते का कोसळत नाहीत? कन्याकुमारीच्या समुद्रात अमेरिकेच्या समुद्रात, मुंबईच्या चौपाटीवर, रंकाळा तलावात उभालेले पुतळ्यांना अजून काहीही झालं नाही. प्रतापगडावर ताशी 120 किलोमीटर वेगाने वाहतात. मात्र, तिथले पुतळे जागच्या जागीच आहे. जयदीप आपटेचा पत्ता नौदलाला कोणी दिला असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.




