Jayakumar Rawal – राज्य शासनाच्या मॅग्नेट प्रकल्पातून फळे, भाजीपाला, फुलांच्या विक्रीसाठी एक साखळी निर्माण करण्यात येणार आहे. जागतिक पातळीवरील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती राज्यात निर्माण करण्यात येणार आहे. जल, रेल्वे,वाहतूक, विमानतळ, तसेच महामार्गांशी ही बाजारपेठ जोडण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे पणनमंत्री जयकुमार रावल यांनी केली. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आणि पुणे जिल्हा परिषदेच्या मार्केट यार्ड येथील आंबा महोत्सवाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. त्यावेळी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, सरव्यवस्थापक विनायक कोकरे, राज्याचे पणन संचालक शरद जरे, तसेच पुणे बाजार समितीचे सभापती प्रकाश जगताप त्यावेळी उपस्थित होते. मार्केट यार्डातील बाजार आवारात देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्था, महामंँगो यांच्याकडून आंबा उत्पादक शेतकरी ते ग्राहक या कल्पनेतून आंबा महोत्सवाचे आयोजन होते. यात १५० शेतकरी सहभागी झाले आहेत. महोत्सवात कोकणातील हापूस, केशर, पायरी, तसेच विविध वाणांचे आंबे उपलब्ध आहेत’ असे रावल यांनी सांगितले. संजय कदम यांनी प्रास्ताविक केले. विनायक कोकरे यांनी आभार मानले.