मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित असे यश मिळाले नाही. त्यामध्ये त्यांना मराठवाड्यात मोठा फटका बसला. मराठवाड्यातील 8 पैकी केवळ 1 जागेवर महायुतीचा उमेदवार विजयी झाला असून मराठवाड्यातील भाजपच्या सर्वच उमेदवारांचा पराभव झाला. त्यामुळे, राज्यातील भाजपच्या पराभवाचा विश्लेषण करताना भाजपकडून विविध कारणे देण्यात आली. मात्र माजी केंद्रीयमंत्री आणि भाजप नेते भागवत कराड यांनी थेट कबुलीच दिली. मराठवाड्यात जरांगे फॅक्टर चालला, असे म्हणत कराड यांनी मनोज जरांगेंमुळे मराठवाड्यात भाजपचा पराभव झाला असल्याचे म्हंटले आहे. भाजप नेते आणि माजी केंद्रीयमंत्री भागवत कराड यांनीही स्पष्ट कबुली दिली आहे. बाकीच्या विभागात माहिती नाही, पण मराठवाड्यात महायुतीच्या पिछेहाटीसाठी जरांगे फॅक्टर कारणीभूत ठरल्याची स्पष्टोक्ती माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री आणि भाजपाचे खासदार डॉ.भागवत कराड यांनी दिली. ते अकोला येथे एका पत्रकार परिषदेत बोलत होते. लोकसभा निवडणुकीनंतर पक्षाच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी डॉ. कराड अकोल्यात आले होते.