जारण चित्रपटाने रचला इतिहास! अवघ्या तीन आठवड्यात केली बक्कळ कमाई; कलाकारांकडून सक्सेस पार्टी

Jaran Movie Success Party : सध्या मराठी सिनेसृष्टीत नवनवे विषय हाताळले जात आहे. मराठी चित्रपट बघण्यासाठी प्रेक्षक थिएटर्सकडे जात नाही, असे सातत्याने बोलले जाते. कुठेही मराठी चित्रपटांचा विषय निघाला की हा मुद्दा प्रकर्षाने समोर येतो. यावर अनेकजण आपापली मते नोंदविताना दिसतात. मात्र, गेल्या काही महिन्यात काही चित्रपटांनी ही गोष्ट मोडीत काढत रसिक मायबापाला चित्रपट पाहण्यासाठी थिएटर्समध्ये आकर्षित केले आहे. ६ जून रोजी रिलीज झालेला ‘जारण’ हा चित्रपट त्यापैकीच आहे.
६ जून रोजी रिलीज झालेल्या जारण चित्रपटाने एका महिन्याच्या आत तब्बल ६ कोटींची बक्कळ कमाई करत नवा इतिहास रचला आहे. चित्रपटाला मिळालेले भरभरून यश सेलिब्रेट करण्यासाठी या चित्रपटातील कलाकारांनी सक्सेस पार्टीचे आयोजन केले होते. या सक्सेस पार्टीला चित्रपटाचे दिग्दर्शक ऋषीकेश गुप्ते, निर्माते अनीज बझमी चित्रपटातील मुख्य कलाकार अभिनेत्री अमृता सुभाष आणि अनिता दाते यांनी देखील हजेरी लावली होती. तसेच चित्रपटातील इतर कलाकारही यावेळी उपस्थित होते.
‘जारण’ या शब्दाचा अर्थ करणी असा केला जातो. या चित्रपटाची कथा या विषयाला घेऊन तयार करण्यात आले आहे. याशिवाय चित्रपट अंधश्रद्धेवरही भाष्य करतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक जारण पाहिल्यानंतरचा अनुभव शेअर करत आहेत. याशिवाय चित्रपटात प्रमुख भूमिकेत असलेल्या अभिनेत्री अमृता सुभाष आणि अनिता दाते यांच्या भूमिकेंची कौतुक प्रेक्षक करत आहेत. बॅालीवूड चित्रपटांच्या भाऊगर्दीत जारण हा चित्रपट प्रेक्षकांना थिएटर्सकडे खेचून आणण्यात यशस्वी झाला आहे.





