टोकियो : जपानचे नियोजित पंतप्रधान शिंगेरू इशिबा यांनी मुदतपूर्व संसदीय निवडणुका घेण्याचे सूतोवाच केले आहे. उद्या (मंगळवारी) पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर संसदेच्या निवडणुका २७ ऑक्टोबर रोजी घेण्यात येतील, असे इशिबा यांनी म्हटले आहे. सत्तारुढ लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते म्हणून इशिबा यांची शुक्रवारी निवड करण्यात आली. या पक्षाच्या नेतृत्वाखाली संसदेत आघाडीचे सरकार आहे. विद्यमान पंतप्रधान फुमिओ किशिदा हे उद्या (मंगळवारी) पंतप्रधान पदावरून पायउतार होणार आहेत. त्यानंतर इशिबा हे पंतप्रधान होणार आहेत. आज झालेल्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींच्या बैठकीत इशिबा यांनी मुदतपूर्व निवडणुकांच्या तारखांची घोषणाच करून टाकली. इशिबा हे सध्या पंतप्रधान नाहीत, त्यामुळे ही घोषणा म्हणजे सरकारची अधिकृत घोषणा मानली जाऊ शकत नाही. मात्र निवडणुकांची पूर्वतयारी करणे सोपे जावे यासाठीच आपण तारीख आगोदर जाहीर केल्याचे इशिबा म्हणाले. दुसऱ्या महायुद्धानंतर लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाची सत्ता जपानमध्ये अबाधित राहिली आहे. इशिबा हे माजी संरक्षण मंत्री आणि सुरक्षा विषयक तज्ज्ञ मानले जातात. अमेरिकेबरोबरच्या संरक्षण सहकार्याचा त्यांनी जोरदार पुरस्कार केला आहे. नाटोच्या आशियातल्या आघाडीचाही त्यांनी आग्रह धरला आहे. रशिया आणि चीनच्या आक्रमक धोरणांमुळे जपानमध्ये राजकीय स्थिरता आवश्यक असल्यानेच मुदपूर्व निवडणुकांचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.