पुणे जिल्हा | जनसन्मान यात्रा उद्या इंदापुरात

इंदापूर, (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेसची जनन्मान यात्रा शुक्रवारी (दि. 23) इंदापूर तालुक्या येणार आहे. तालुक्यातील प्रत्येक घटकांनी या जनसन्मान यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले.
इंदापूर शहरातील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विभागीय सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इंदापूर तालुका यांच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन बुधवारी (दि. 21) करण्यात आले होते. त्यावेळी भरणे बोलत होते.
यावेळी पक्षाचे प्रवक्ते डॉ. शशिकांत तरंगे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप पाटील, तालुका अध्यक्ष हनुमंतराव कोकाटे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
भरणे म्हणाले की, सर्व घटकांसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चालू वर्षाच्या बजेटमध्ये भरीव तरतूद करून मोठा न्याय दिला आहे. इंदापूर तालुक्यातील लाडक्या बहिणी, भाऊ, शेतकर्यांना, व्यापार्यांना हे बजेट वरदान ठरले आहे.
उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष अजितदादा पवार यांचे विचार जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून घेण्यासाठी मोठ्यासंख्येने या यात्रेत सहभागी व्हावे.
तसेच यात्रेच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी या जनसन्मान यात्रेची संपूर्ण तयारी केली असल्याचे त्यांनी नमूद केले.
उपमुख्यमंत्री भूमिपूजन करणार
नगर विकासखात्याच्या माध्यमातून 90 कोटींच्या रस्त्यांचे, इंदापूर शहराच्या गटार योजनेचे, उजनी धरणावरून शिरसवडी पूलाच्या कामाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री वीरश्री मालोजीराजे यांच्या गढी, चांद सावली बाबा यांचा दर्ग्यास भेट देऊन दर्शन घेणार आहेत.





