Pimpri : जनसंवाद सभा की ‘राजकीय शो’?

पिंपळे गुरव : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयात सोमवारी (दि. २८) पार पडलेली जनसंवाद सभा सार्वजनिक तक्रारींच्या माऱ्यामुळे गाजली. नागरिकांच्या वैयक्तिक अडचणी ऐकण्यासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या या सभेचा काही राजकीय कार्यकर्ते ‘स्वतःचा झेंडा’ फडकवण्यासाठी वापर करत असल्याचे धक्कादायक चित्र उघड झाले आहे.
सभेसाठी उपायुक्त तथा मुख्य समन्वय अधिकारी निलेश भदाणे, क्षेत्रीय अधिकारी पुजा दूधनाळे, विद्युत कार्यकारी अभियंता गणेश राऊत, पाणीपुरवठा अभियंता निलेश दाते, स्थापत्य अभियंता सतीश वाघमारे, कनिष्ठ अभियंता सुनील दांगडे, ड्रेनेज उप अभियंता शोएब शेख, उद्यान अधीक्षक हर्षद शिखरे आणि आरोग्य निरीक्षक सचिन जाधव आदी उपस्थित होते.
प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या सोमवारी होणाऱ्या या जनसंवाद सभांमध्ये, कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी, संत तुकाराम नगर, सांगवी, पिंपळे गुरव या भागातील ‘तेच ते’ नेहमीचे चेहरे पुन्हा पुन्हा हजेरी लावत आहेत. विशेष म्हणजे हे कार्यकर्ते आपल्या पार्टीच्या लेटरहेडवर तब्बल सहा ते आठ सार्वजनिक तक्रारी टाईप करून घेऊन येतात आणि मोठमोठ्याने बोलत सभा ‘गाजवतात’.
सभेचा मूळ उद्देश नागरिकांच्या वैयक्तिक तक्रारींचे त्वरित निरसन असताना, सार्वजनिक तक्रारींच्या याच गर्दीत सामान्य तक्रारदारांना २०-२५ मिनिटे ताटकळत बाहेर उभे राहावे लागत आहे. काही तक्रारदार तर आपली तक्रार मांडण्याआधीच कंटाळून परत जात असल्याचे चित्रही यावेळी दिसून आले.
सोशल मीडियासाठी फोटोशूट
एका पक्षाच्या कार्यकर्त्याने तर थेट आपल्या सहकाऱ्याला फोटो काढायला सांगत, जनसंवाद सभेत प्रश्न मांडतानाचे फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धडपड केली. त्यामुळे हा प्रकार नागरिकांच्या प्रश्नांपेक्षा स्वप्रचाराच्या उद्देशाने होत आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अधिकारीही डोळे झाकून
या सर्व प्रकारांकडे मुख्य समन्वय अधिकारी व क्षेत्रीय अधिकारी उघडपणे दुर्लक्ष करताना दिसले. आयुक्त शेखर सिंह यांनी दिलेल्या स्पष्ट आदेशानुसार, जनसंवाद सभा ही वैयक्तिक अडचणी, तक्रारी व सूचना ऐकण्यासाठी असते. मात्र, त्या ऐवजी काही कार्यकर्त्यांकडून त्याच त्याच तक्रारींचा ढिग जनसंवाद सभेत ठेवला जात आहे.
१५ तक्रारी, बहुतांश सार्वजनिक
या जनसंवाद सभेत एकूण १५ तक्रारी प्राप्त झाल्या, त्यापैकी बहुतांश तक्रारी सार्वजनिक स्वरूपाच्या होत्या. पाणी पुरवठा, ड्रेनेज लाईन, स्टॉर्म वॉटर, क्रीडा सुविधा, उद्यान, अतिक्रमण आणि स्थापत्य विभागाशी संबंधित तक्रारींवर चर्चा करण्यात आली.
वैयक्तिक तक्रारदारांना न्याय मिळावा!
या पार्श्वभूमीवर अनेक नागरिकांनी मागणी केली आहे की, वैयक्तिक तक्रारदारांचा वेळ व हक्क अबाधित राहावा, यासाठी प्रशासनाने त्याच त्या चेहऱ्यांवर नियंत्रण ठेवावे. अन्यथा, या सभा सामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्याऐवजी, फक्त राजकीय छायाचित्रांचा स्टेज ठरण्याचा धोका आहे.
फोटो कोण काढत आहे याकडे लक्ष देणे शक्य नाही. नागरिकांनी जनसंवाद सभेचा उपयोग करून घेतला पाहिजे. वयक्तिक समस्या मांडण्यासाठी नागरिकांनी पुढे आले पाहिजे. सामूहिक स्वरूपाच्या तक्रारी कोणी करीत असतील तर यापूर्वी त्यांना सांगितले होते की अशा स्वरूपाच्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही.
इतर वेळेमध्ये त्यांनी क्षेत्रीय कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांशी तक्रारी करू शकता. अशा सूचनाही त्यांना दिल्या आहेत. समूहांकडून निवेदने दिली जातात. त्यामधील काही निवेदने नागरिकांच्या दृष्टीने महत्वाची असल्यामुळे निर्णय घेणे आवश्यक असते. एखादी तक्रार गंभीर असते. यावेळी ती वयक्तिक आहे की सामूहिक आहे हा विषय बाजूला ठेवावा लागतो. पाच तक्रारींमध्ये नागरिकांच्या हिताची एखादी तक्रार असल्याने त्याला प्राधान्य द्यावे लागते.
– निलेश भदाणे, उपायुक्त तथा मुख्य समन्वय अधिकारी





