Jannat Zubair : अभिनेत्री आणि सोशल मीडिया स्टार जन्नत जुबैर (Jannat Zubair) रहमानी हिने खूप लहान वयात करिअर सुरू करून आज मोठं यश मिळवलं आहे. अवघ्या २४व्या वर्षी ती देशातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या आणि लोकप्रिय डिजिटल क्रिएटर्सपैकी एक बनली आहे. टीव्ही इंडस्ट्री सोडून तिने कंटेंट क्रिएशनच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. जन्नतने केवळ ७ वर्षांची असताना अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. बालकलाकार म्हणून तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आणि प्रेक्षकांच्या मनात घर केलं. ‘फुलवा’ या मालिकेमुळे ती विशेष प्रसिद्ध झाली. त्याशिवाय तिने ‘माटी की बन्नो’ आणि ‘भारत का वीर पुत्र-महाराणा प्रताप’ यांसारख्या मालिकांमध्येही काम केलं. त्यामुळे ती घराघरात ओळखली जाऊ लागली. Jannat Zubair २०१८ पर्यंत जन्नतने टीव्हीवर काम केलं, पण नंतर तिने हा मार्ग सोडण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय तिच्यासाठी सोपा नव्हता. कारण तिला लहानपणापासून सतत काम करण्याची सवय होती. अचानक काम थांबल्यामुळे ती बेचैन झाली होती. तिला वेळ कसा घालवायचा, हेही कळत नव्हतं. याच काळात तिच्या भावाने तिला डिजिटल प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ बनवण्याचा सल्ला दिला. त्यानंतर जन्नतने कंटेंट क्रिएशनकडे वळण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला तिने यूट्यूबवर मेकअप, हेअरस्टाइल आणि लाइफस्टाइलशी संबंधित व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. नंतर ती इंस्टाग्रामवर सक्रिय झाली आणि रील्स बनवू लागली. Jannat Zubair हळूहळू जन्नतची लोकप्रियता वाढत गेली आणि ती डिजिटल जगतात मोठं नाव बनली. आज तिचे इंस्टाग्रामवर ५० दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ब्रँड कोलॅबोरेशन, जाहिराती आणि सोशल मीडिया कंटेंटमुळे ती दरवर्षी कोट्यवधी रुपयांची कमाई करते. Jannat Zubair रिपोर्ट्सनुसार, जन्नत जुबैरची एकूण संपत्ती सुमारे २५० कोटी रुपये आहे. त्यामुळे ती भारतातील सर्वात श्रीमंत आणि जास्त मानधन घेणाऱ्या टीव्ही अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. सध्या ती ‘लाफ्टर शेफ्स’ या शोमध्येही दिसत आहे, ज्यासाठी ती एका एपिसोडसाठी १ ते २ लाख रुपये मानधन घेत असल्याचं सांगितलं जातं. याशिवाय जन्नतने ‘नाझ’ नावाने ज्वेलरी व्यवसायही सुरू केला आहे, जो तिच्या आईच्या नावावर आहे. तसेच ती लवकरच ‘ग्लोरी’ या मालिकेतही दिसणार आहे, जी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. जन्नत जुबैरची ही यशोगाथा दाखवते की, योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर करिअरमध्ये मोठं यश मिळवता येतं. टीव्ही सोडून डिजिटल प्लॅटफॉर्मची निवड करणं हा तिच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला आणि आज ती कोट्यवधींची मालकीण बनली आहे.