सासवड : सासवड नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनमत विकास आघाडीने आपले अस्तित्व ठळकपणे दाखवले आहे. आघाडीतर्फे दोन उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल करून निवडणुकीच्या रणसंग्रामाची औपचारिक सुरुवात केली आहे. नगराध्यक्ष पदासाठी दत्तात्रय युवराज घाटे यांनी जनमत विकास आघाडीतर्फे अर्ज दाखल केला आहे, तर प्रभाग क्रमांक सात ‘ब’ सर्वसाधारण जागेसाठी कल्याणकर रवि नरसिंग यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या दोन्ही अर्जांमुळे सासवडमध्ये जनमत विकास आघाडी आता सक्रिय झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. स्थानिक राजकारणात गेल्या काही वर्षांपासून जन्मत विकास आघाडीचे वर्चस्व कायम आहे. माजी आमदार संजय जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे जनमत विकास आघाडी मोडीत निघणार, अशी चर्चा होती. परंतु यावेळी जनमत विकास आघाडीने मैदानात उतरल्यामुळे भाजपसाठी नवीन समीकरणे आणि आव्हाने निर्माण होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. आघाडीच्या कार्यकर्त्यांनी नगरपरिषदेच्या विविध प्रभागांमध्ये जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे. शहराच्या विकासाच्या मुद्द्यांवर प्रचार रंगणार असल्याची चर्चा आहे. शहरातील नागरिकांच्या समस्या, पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, कचरा व्यवस्थापन आणि वाढती वाहतूक यांसारख्या मुद्यांवर जनमत विकास आघाडीने आपले धोरण ठळकपणे मांडण्याची तयारी सुरू केली आहे. “सासवडचा सर्वांगीण विकास आणि जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य” हे घोषवाक्य घेऊन या आघाडीचे उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. राजकीय तज्ज्ञांच्या मते, सासवड नगरपरिषद निवडणुकीत यावेळी भाजप आणि जनमत विकास आघाडी यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही जनमत विकास आघाडीला पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याचे समजते. त्यामुळे भाजपऐवजी “जनमत विकास आघाडी” या पॅनलवर निवडणूक लढविण्याची चर्चा अधिक गडद होत आहे. सासवडमध्ये याआधी अनेक लढती पारंपरिक पद्धतीने झाल्या असल्या, तरी यावेळी नव्या राजकीय आघाड्यांच्या प्रवेशामुळे निवडणूक अधिक रंगतदार होणार आहे.