उलझ चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज; जान्हवी कपूर दिसणार ‘या’ भूमिकेत

बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूरच्या आगामी उलझ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. उलझ चित्रपट येत्या 2 ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात जान्हवी कपूर,गुलशन देवैया, रोशन मैथ्यू, राजेश तेलंग आणि मियांग चांग यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुधांशु सरिया यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
जान्हवी कपूर दिसणार ‘या’ भूमिकेत
जान्हवी कपूरने उलझ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये जान्हवी भारतीय परराष्ट्र सेवा अधिकाऱ्याची भूमिका बजावताना दिसणार आहे. ट्रेलर शेअर करताना जान्हवीने कॅप्शनमध्ये लिहिले कि, ‘प्रत्येकाची एक कथा आहे. प्रत्येक कथेत रहस्यं दडलेली असतात. प्रत्येक रहस्य एक सापळा आहे. हा संभ्रम सोडवणं सोपे जाणार नाही. उलझ ट्रेलर आता रिलीज झाला आहे.’
काय आहे ट्रेलरमध्ये?
ट्रेलरची सुरुवात जान्हवी कपूरपासून होते. ट्रेलरमध्ये जान्हवीचा प्रवास दाखवण्यात आला आहे. उलझ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये जान्हवी सुहाना भाटिया या देशातील सर्वात तरुण डेप्युटी हाय कमिशनरच्या भूमिकेत दिसत आहे. सुहानावर ‘नेपो’ किड असल्याचा आरोप होताना दिसत आहे. ट्रेलरची सुरुवात सस्पेन्सने होते. भारतीय गुप्तचर माहिती लीक होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो. यानंतर जान्हवी कपूरची म्हणजेच सुहाना भाटियाची एन्ट्री होते. सुहानाने सेंट स्टीफन आणि हार्वर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतले असून ती देशातील सर्वात तरुण उप उच्चायुक्त बनली आहे.





