Janhvi Kapoor Statement: बांगलादेशमध्ये २७ वर्षीय हिंदू युवक दीपू चंद्र दास याच्या कथित मॉब लिंचिंगच्या घटनेवर अभिनेत्री जान्हवी कपूर हिने तीव्र संताप व्यक्त केला आहे. या घटनेबाबत अज्ञान दाखवणे किंवा गप्प बसणे हेही गुन्ह्यातील सहभागासारखेच असल्याचे तिने स्पष्ट केले. बांगलादेशमध्ये अल्पसंख्याकांवर होत असलेल्या हिंसाचाराविरोधात जान्हवी कपूरने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका ठामपणे मांडली आहे. कथित ईशनिंदेच्या आरोपाखाली दीपू चंद्र दास याला जमावाने बेदम मारहाण करून ठार मारण्यात आले आणि नंतर त्याचा मृतदेह जाळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या अमानुष घटनेने आंतरराष्ट्रीय स्तरावर संतापाची लाट उसळली आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना जान्हवी कपूरने लिहिले की, “दीपू चंद्र दास… हा निव्वळ खून नाही, तर हा नरसंहार आहे. ही एखादी एकटी घटना नाही. जर तुम्हाला या क्रूर मॉब लिंचिंगबद्दल माहिती नसेल, तर त्याबद्दल वाचा, व्हिडिओ पाहा आणि प्रश्न विचारा.” तिने ठामपणे सांगितले की अशा घटनांकडे दुर्लक्ष करणे किंवा मौन बाळगणे हेही एका प्रकारे गुन्ह्यालाच पाठिंबा देणे आहे. दुहेरी भूमिकेवर जान्हवीने उपस्थित केले प्रश्न जान्हवी कपूरने समाजातील दुहेरी भूमिकेवरही टीका केली. तिने म्हटले की जगाच्या एखाद्या दूरच्या भागात घडलेल्या घटनांवर आपण दुःख आणि राग व्यक्त करतो, पण आपल्या आजूबाजूला किंवा शेजारील देशांत अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचारांकडे डोळेझाक करतो. “बांगलादेशमध्ये जे घडत आहे ते पाहूनही जर तुम्हाला राग येत नसेल, तर हीच ती दुहेरी मानसिकता आहे जी आपल्यासाठी धोकादायक आहे. आपण दूरच्या घटनांवर रडतो, पण आपल्या भाऊ-बहिणींना जळताना पाहत राहतो,” असे तिने लिहिले. मानवतेचे महत्त्व अधोरेखित सांप्रदायिक द्वेष आणि कट्टरपंथाचा निषेध करताना जान्हवी कपूर म्हणाली की कोणत्याही परिस्थितीत मानवतेपेक्षा मोठे काहीही असू नये. पीडित असो किंवा आरोपी, प्रत्येकाकडे माणूस म्हणून पाहिले गेले पाहिजे. तिने लोकांना आवाहन केले की योग्य माहिती घ्या आणि द्वेष व हिंसाचाराच्या राजकारणाचे बळी ठरणाऱ्या निरपराध लोकांसाठी उभे राहा.