जिद्द आणि मेहनत ! आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवत जान्हवी झाली डॉक्टर..

नेवासा – नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथील डॉ.जान्हवी अशोक पेहरकर नुकतीच बी.एच.एम.एस परिक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली. जान्हवीचे प्राथमिक शिक्षण भानसहिवरा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत व माध्यमिक शिक्षण जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्रीराम हायस्कूलमध्ये भानसहिवरे येथे झाले. बारावीपर्यंतचे शिक्षण ज्ञानेश्वर महाविद्यालय नेवासा येथे आणि अहमदनगर येथील मेडिकल होमिओपॅथिक कॉलेज येथून त्यांनी बीएचएमएस पूर्ण केले.
युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स (नाशिक) हिवाळी २०२३ यांनी नुकताच बीएचएमएस अंतिम वर्षाचा निकाल घोषित केला यामध्ये डॉ.जान्हवी अशोक पेहरकर प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली.
अतिशय खडतर परिस्थितीत दुसऱ्यांच्या शेतावर शेतमजूर म्हणून काम करणारी आई व वृत्तपत्र विक्रेते व पत्रकार अशोक पेहरकर यांच्या मुलीने बीएचएमएस परीक्षा उत्तीर्ण होऊन नेत्रदीपक यश प्राप्त केले.
डॉ.श्रुती व डॉ.जान्हवी आणि छत्रपती संभाजीनगर येथे कायद्याचे शिक्षण घेत असलेली ॲड.अस्मिता या तीन मुलींना उच्च शिक्षण देणाऱ्या वडिलांचे शिक्षण बारावीपर्यंत तर आईचे शिक्षण दहावीपर्यंत झालेले असूनही त्यांना तीनही मुलींनी उच्चशिक्षित व्हावे अशी इच्छा होती आणि त्यांनी ती पूर्ण केली.
माझ्या मुलीला गरिबीची जाणीव असल्याने तीने आम्हाला कधीही जास्तीचा आर्थिक त्रास दिला नाही.तिचा खर्च ती नगरमधील साईदिप हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय काम करून करत होती. दोन्ही डॉक्टर मुलींसाठी बँक ऑफ बडोदा,शाखा भेंडा यांच्या कडून शैक्षणिक कर्ज घेवून व इतर जो खर्च येईल तो आम्ही मोलमजुरीमधून भागवून तीला शिक्षणासाठी पैसा दिला. आणि तीने गरिबीची जाण असल्यामुळेच हे यश संपादन केले.
– अशोक पेहरकर, वडील (वृत्तपत्र विक्रेता व पत्रकार)
आमच्या घरात कुणी उच्च शिक्षित नाही. आई-वडिलांच्या कष्टाचे चीज व्हावे,घरातून डॉक्टर क्षेत्रातला अनुभव किंवा मार्गदर्शन नाही. या यशापर्यंत पोहचण्यासाठी माझ्या आई – वडिलांचा मोठा हातभार आहे. मी आज जी काही आहे ते माझ्या आई-वडिलांच्या कष्टाचे फळ आहे. भानसहिवरा येथील डॉ.जे. ई. नरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली माझी मोठी बहीण डॉक्टर होणार हे समजताच मीही डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहून ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि आज माझे स्वप्न पूर्ण झाले.
– डॉ.जान्हवी पेहरकर




