‘इंडिया’ आघाडीतील एक नेता नाराज, म्हणाला – ‘फक्त चहा- बिस्किटांवरच बैठक संपली, समोसाही नाही मिळाला’

नवी दिल्ली – विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची मंगळवारी दिल्लीत बैठक झाली. ममता बॅनर्जी, लालू प्रसाद यादव, अखिलेश यादव आणि नितीश कुमार यांच्यासह अनेक प्रमुख नेते बैठकीत सहभागी होण्यासाठी दिल्लीत पोहोचले होते. आगामी लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याचे सांगितले गेले. बैठक अत्यंत यशस्वी झाल्याचा दावा कॉंग्रेसच्या नेत्यांकडून केला गेला. मात्र नितीश यांच्या संयुक्त जनता दलाच्या नेत्यांनी वेगळाच सूर लावला आहे.
जनता दलाचे खासदार सुनील कुमार पिंटू यांनी तर अगदी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. बैठकीत उपस्थित नेत्यांना किमान समोसा खाउ घालू शकतील एवढेही पैसे कॉंग्रेस पक्षाकडे नव्हते अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे. केवळ चहा आणि बिस्किटांवरच बैठक समाप्त करण्यात आली. अगोदर किमान समोसा तरी मिळायचा. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत पिंटू म्हणाले की बैठकीत कोणतीही अर्थपूर्ण चर्चा झाली नाही. एवढे मोठे नेते बैठकीसाठी दिल्लीला आले होते. तथापि, त्यात काहीच साध्य झाले नाही.
कॉंग्रेस पक्षाकडून सुरू करण्यात आलेल्या देणगी अभियानावरही त्यांनी टीका केली. ते म्हणाले, आमच्याकडे निधीची कमतरता असल्याचे कॉंग्रेसने म्हटले आहे. देणगी म्हणून ते लोकांकडून १३८, १३८०, १३८०० या स्वरूपात रक्कम स्विकारत आहेत. मात्र त्यांच्याकडे अद्याप पैसे आले नसल्यामुळे त्यांनी केवळ चहा आणि बिस्किटांवरच बैठक आटोपली. कोणताही गंभीर विषय चर्चेला आला नाही.
दरम्यान, इंडिया आघाडीच्या चौथ्या बैठकीनंतर बिहारमधील नेते नितीश आणि लालू हे दोघे नाराज असल्याची चर्चा आहे.
बैठकीच्या अगोदर दोघेही अगदी आनंदात होते. नितीश यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित केले जाण्याची मागणी करणारे पोस्टरही लागले होते. तथापि, बैठकीच्या समाप्तीनंतर दोघांच्या चेहऱ्यावरचे हास्य पूर्ण लोपले होते. त्यांनी अधिकृतपणे काही भूमिका मांडली नसली तरी इंडियाच्या सूत्रांनीच दिलेल्या माहितीनुसार बैठकीत जेंव्हा ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नावाचा प्रस्ताव पुढे केला तेंव्हापासून नितीश यांची अस्वस्थता वाढीला लागली.





