मुंबईकरांसाठी आता ‘जन कोविड’ हेल्पलाइन

मुंबई : राज्यात करोनाचा प्रसार सर्वाधिक प्रादुर्भाव हा मुंबईत वाढत आहे. त्यामूळे मुंबईतील करोना रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. दरम्यान, फार्मा क्षेत्रातील आघाडीच्या लुपिन लिमिटेडने (लुपिन) मुंबईतील रहिवाशांसाठी ‘मन का स्वास्थ्य, तन की सुरक्षा’ या अंतर्गत ‘जन कोविड’ हेल्पलाइन (1800-572-6130) सुरू केल्याचे आज जाहीर केले आहे.
लॉकडाउन सुरू असताना वैद्यकीय मदत मिळवणे, हे मोठे आव्हान आहे. या उपक्रमामुळे, कोविड-19 विषयीच्या शंका, लक्षणे, जवळच्या चाचणी केंद्राचा किंवा सरकारी रुग्णालयाचा तपशील नागरिकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. तसेच ताण, चिंता किंवा मानसिक आरोग्याच्या समस्यांमुळे पीडित लोकांना मदत केली जाणार आहे.
जनरल फिजिशिअन, मानसशास्त्रज्ञ, रेस्पिरेटरी फिजिशिअन व सायकॉलॉजिस्ट यांच्या टीमची मदत असणारी ही हेल्पलाइन मोफत सल्लासेवा देणार आहे आणि कोविड-19विषयी शंकांची उत्तरे देणार आहे. ही सेवा मराठी, हिंदी, गुजराती व इंग्रजी या भाषांमध्ये दररोज सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत उपलब्ध आहे.





