Jammu Accident : जम्मूत लष्करी वाहनाला अपघात; 3 जवान शहीद

जम्मू : जम्मू-काश्मिरातील रामबन जिल्ह्यातील बॅटरी चष्मा भागात रविवारी लष्कराचे एक वाहन 600 मीटर खोल दरीत कोसळले. या अपघातात तीन जवान शहीद झाले आहेत. हा अपघात सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास घडला. हा ट्रक जम्मू-श्रीनगरला जाणाऱ्या सैनिकांच्या ताफ्यातील एक भाग होता. अपघात झाल्यानंतर लगेच मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले.
अमित कुमार, सुजीत कुमार आणि मान बहादुर असे शहीद जवानांची नावे आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितले की, जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर रामबन जिल्ह्यातील बॅटरी चश्माजवळ चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे वाहन थेट दरीत कोसळले. या दुर्घटनेत तीन जवान जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेची माहिती मिळताच सैन्य, पोलीस, एसडीआरएफ आणि स्थानिक स्वयंसेवकांनी एकत्रीत बचाव मोहीम सुरू केली.
दरम्यान, यापूर्वी ४ जानेवारी रोजी बांदीपोरा जिल्ह्यात लष्कराचा ट्रक खड्ड्यात कोसळल्याने चार जवानांचा मृत्यू झाला होता. २ सैनिक गंभीर जखमी झाले. ट्रकमध्ये फक्त ६ सैनिक होते. तसेच २४ डिसेंबर रोजी पूंछ जिल्ह्यात लष्कराची एक व्हॅन ३५० फूट खोल दरीत कोसळली होती. तेव्हा व्हॅनमध्ये १८ सैनिक होते. त्यापैकी ५ जणांचा मृत्यू झाला होता. अपघातात सहभागी झालेले सर्व सैनिक ११ मराठा रेजिमेंटचे होते.





