श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारताने आक्रमक पवित्रा घेतला आहे. हा हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना शोधू काढण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. असे असतानाच आता भारतीय सैन्याने काश्मीरमध्ये सक्रियपणे कार्यरत असलेल्या १४ स्थानिक दहशतवाद्यांची यादी जाहीर केली आहे. या दहशतवाद्यांची संपूर्ण माहिती भारतीय सेनेने मिळवलेली आहे. याच माहितीनुसार सोपोर भागात लष्कर ए तोयबाचा एक स्थानिक दहशतवादी सक्रीय आहे. तसेच अवंतीपुरा या भागात जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा एक सदस्य सक्रीय आहे. पुलवामामध्ये जैश ए मुहम्मद आणि लष्कर ए तोयबा या दोन्ही दहशतवादी संघटनांचे प्रत्येकी दोन दहशतवादी सक्रीय आहेत. सोफीयान या भागातही हिजबूलचा एक आणि लष्कर ए तोयबाचे चार, तर अनंतनागमध्ये हिजबूलचचे दोन स्थानिक दहशतवादी सक्रीय आहेत. गुलमाम या भागातही लष्कर ए तोयबाचा एक स्थानिक दहशतवादी सध्या सक्रीय आहे. या सर्वच दहशतवाद्यांची माहिती भारतीय सेनेने प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे आगामी काळात त्यांचे काय होणार? याकडे सर्वांचच लक्ष असणार आहे. भारतीय सेनेला घाबरून नुकतेच कश्मीर रेजिस्टन्स फ्रंटने तीन दिवसांनी पहलगामच्या हल्ल्याची जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे. दुसरीकडे आतापर्यंत भारतीय सैन्याने अनेक संशयितांना तांब्यात घेतले आहे. आतापर्यंत एकूण 7 दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. दरम्यान, दुसरीकडे भारताने पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी मोठे निर्णय घेतले आहेत. यालाच प्रत्युत्तर म्हणून पाकिस्ताननेही काही भारतविरोधी निर्णय घेतले आहेत. सिंधू जलवाटप करार स्थगित करून पाणी आडवले तर आम्ही त्याला प्रत्युत्तर देऊ, असा इशारा पाकिस्तानच्या पंतप्रधानाने दिला आहे. त्यामुळे आगामी काळात नेमके काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. स्थानिक 14 दहशतवाद्यांची नावे आदिल रहमान देंटू (२१), आसिफ अहमद शेख (२८), अहसान अहमद शेख (२३), हरिस नजीर (२०), आमिर नजीर वाणी (२०), यावर अहमद भट, आसिफ अहमद खांडे (२४), नसीर अहमद वाणी (२१), शाहिद अहमद कुटे (२७), आमिर अहमद दार, अदनान सफी दार, जुबैर अहमद वाणी (३९), हारून रशीद गनई (३२) आणि झाकीर अहमद गनी (२९). 175 संशयितांना ताब्यात भारतीय लष्कराने मोठी कारवाई करत अनंतनाग जिल्ह्यात तब्बल 175 संशयितांना ताब्यात घेतले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर अनंतनाग पोलीस, लष्कर, सीआरपीएफ आणि इतर एजन्सींच्या संयुक्त पथकांनी जिल्ह्यात शोध मोहीम सुरु केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांकडून सध्या दक्षिण काश्मीरमध्ये कारवाई सुरु आहे. सुरक्षा दलांनी गेल्या 48 तासांत 175 हून अधिक संशयित ताब्यात घेतले आहेत. तसेच पोलिसांकडून सर्वसामान्य नागरिकांना देखील महत्त्वाचे आवाहन केले जात आहे. काही संशयास्पद हालचाली आढळल्यास पोलिसांना तातडीने कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.