Jammu Kashmir | उरीमध्ये मोठा शस्त्रसाठा सापडला

श्रीनगर – जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षकांनी मोठा शस्त्रसाठा हस्तगत केला आहे. यामध्ये एके-47 रायफली, पाकिस्तानी बनावटीचे हातबॉम्ब आणि “आय लव्ह पाकिस्तान असे लिहीलेले बलून देखील जप्त करण्यात आले आहेत. जम्मू काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ हा शस्त्रसाठा सापडला आहे, असे लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
पाकिस्तानच्या हद्दीतून जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याचे प्रमाण सध्या अत्यंत कमी असतानाच हा मोठा शस्त्रसाठा सापडला आहे. यामुळे सीमेपलिकडून मोठ्या संख्येने घुसखोरी केली जाण्याची शक्यता बळावली आहे. शुक्रवारी हातलंगा नाल्यातील परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली होती. ही शोधमोहिम तब्बल 8 तास चालली. या शोधमोहिमेदरम्यान हा मोठा शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला.
या शस्त्रसाठ्यामध्ये 8 एके-47 रायफली, 24 एके-74 रायफल मॅगझिन, 560 7.62 एके-74 रायफलींची काडतुसे, 12.30 एमएम चायनीज पिस्तूल, 24 चीनी पिस्तूल मॅगझिन, 244.30 एमएम पिस्तूलांची जिवंत काडतुसे, नऊ चिनी हॅंड ग्रेनेड, पाच पाकिस्तानी बनावटीचे हॅंड ग्रेनेड, “आय लव्ह पाकिस्तान’ असे लिहीलेले 8 बलून आणि पाकिस्तानी मार्किंग असलेले पाच सिंथेटिक बंदुकांच्या नळ्यांचा समावेश आहे. हा शस्त्रसाठा म्हणजे जवळपास युद्धाची तयारीच असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. हा शस्त्रसाठा ताब्यात घेऊन तपासाला सुरुवात करण्यात आली आहे.





