Jammu And Kashmir: नार्को-दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश, 2 कोटी रुपये, ड्रग्ज आणि धोकादायक शस्त्रे जप्त

पूंछ – सुरक्षा दलांनी अमली पदार्थांच्या तस्करीच्या एका मोठ्या मॉड्यूलचा पर्दाफाश केला आणि अमली पदार्थ तस्कर रफी धनाच्या अड्ड्यावरून 7 किलो हेरॉईन, सुमारे 2 कोटी 30 लाख 93 हजार रुपये, अमेरिकन डॉलर्स, 15 हजार रुपये किमतीचे एक पिस्तूल, मॅगझिन आणि 10 काडतुसे जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या हेरॉईनची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे 35 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
रफी धना गेल्या सहा महिन्यांपासून तुरुंगात आहे. 24 फेब्रुवारीलाच पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली होती. या प्रकरणाचे धागेदोरे पंजाबमधील ड्रग्ज तस्करांशी संबंधित असल्याचेही बोलले जात आहे. पंजाबमधील तरनतारन येथील बॅंकेच्या शाखेतून हे पैसे काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
नियंत्रण रेषेजवळ राहणारा रफी धना याच्या प्रकरणाचा पोलीस सतत तपास करत होते. माहिती मिळाल्यानंतर, पुंछ पोलिस, सीआरपीएफ, आर्मी आणि पोलिसांचे एक विशेष पथक दुपारी दोनच्या सुमारास ड्रग तस्कर रफीच्या मंडी तहसीलच्या डन्ना दुइयान गावात पोहोचले. नियंत्रण रेषेजवळ असलेल्या या एकमेव घराला सुरक्षा दलांनी वेढा घातला.
जवान घरात घुसले तेव्हा तेथे दोन महिला उपस्थित होत्या. घरातील दोन खोल्यांना कुलूप होते. बराच वेळ होऊनही चाव्या न मिळाल्याने सुरक्षा दलांनी खोल्यांची कुलूप तोडली. खोलीच्या आतील कपाटामध्ये पाच बॅगा सापडल्या ज्या चलनी नोटांनी भरलेल्या होत्या, तर दोन बॅगमध्ये हेरॉइन सापडले.





