Jammu-Kashmir: बॉम्बस्फोट करण्यासाठी सज्ज असलेल्या तीन दहशतवाद्यांना अटक

राजौरी – जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचे मोड्युल उद्घ्वस्त करण्यात आले असून तिघाजणांना अटक करण्यात आली आहे. जम्मू काश्मीरमधील गर्दीच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणणे आणि सुरक्षा रक्षकांच्या वाहनांना लक्ष्य करण्याचे उद्दिष्ठ या दहशतवाद्यांना देण्यात आले होते.
राजौरीमध्ये प्रेशर आणि टायमर असलेले “आयईडी’सापडल्यानंतर या प्रकरणाचा तपास केला गेला. त्यादरम्यान हे मोड्युल उघड झाले, असे राजौरीचे पोलीस उपमहानिरीक्षक हसीब मुघल यांनी सांगितले. गर्दीच्या ठिकाणी स्फोट घडवण्यासाठी आणि सुरक्षा दलांच्या वाहनांना लक्ष्य करण्यासाठी “आयईडी’ सीमेपलिकडून आणण्यात आले होते. अटक करण्यात आलेल्या तिघाजणांमध्ये या मोड्युलचा म्होरक्याचाही समावेश आहे. या तिघांच्या अटकेमुळे त्यांचे घातपाताचे कारस्थान यशस्वी होऊ शकले नाही, असे मुघल यांनी सांगितले.
दिनांक 18 जानेवारीला खेवरा वस्तीतील सरकारी मेडिकल कॉलेजच्या जवळ एका टिफिन बॉक्समध्ये “आयईडी’ ठेवल्याचे आढळून आले होते. तर 8 जानेवारीला बुधाल भागामध्येही अशाच प्रकारे “आयईडी’ सापडले होते. जानेवारीच्या सुरुवातीला राजौरीच्या धानगिरी गावात “आयईडी’च्या स्फोटात 7 जण ठार आणि 14 जण जखमी झाले होते. या प्रकरणांच्या तपासादरम्यान पहिला आरोपी मजिद दर याला अटक केली गेली होती. त्याच्याकडे चौकशी केल्यावर इतर दोघांची माहिती मिळाली होती.





