जामखेड (प्रतिनिधी) – तालुक्यातील मोहा गावात पाच दिवसांपूर्वी मृत आढळलेल्या कावळ्याचा अहवाल बर्ड फ्लू पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे. तसे आदेश तहसील कार्यालयास प्राप्त झाले आहेत. जामखेड-बीड रस्त्यावरील रेडेवाडी फाट्याजवळ कावळा व कोकीळ पक्षी तडफडून मृत्युमुखी पडले होते. त्यानुसार वनविभाग व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत पक्षी ताब्यात घेवून पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. दरम्यान, कावळ्याचा मृत्यू बर्ड फ्लूनेच झाला असल्याचा अहवाल आला होता. त्यामुळे जामखेड तालुक्यात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागातील पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी घेण्याचे काम पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सुरू करण्यात आले आहे. याबरोबरच तालुक्यातील सर्वच गावांतील पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांचे स्वॅब तपासणी घेण्यात येणार आहेत. दरम्यान तालुक्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी मोहा गाव प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहे. आदेशानुसार मोहा गाव व जवळील 10 किमी अंतराचा परिसर सतर्क झोन जाहीर करण्यात आला असून, या परिसरातील आजारी पशुपक्षी आढळल्यास प्रशासनास कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच परिसरात जीवंत अथवा मृत पक्ष्यांची वाहतूक, विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच कुठे पक्ष्यांचा मृत्यू झालाच, तर त्याची माहिती संबंधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, करोनातून जामखेडकर सावरत नाही तोच बर्ड फ्लूने डोके वर काढल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.