Jamkhed Water Crisis: जामखेड तालुक्यातील २० गावांमधील १८ हजार ६०४ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी उजनी प्रकल्पातून २.५ टीएमसी पाणी मंजूर करावे, या मागणीसाठी आता शेतकरी आक्रमक झाले आहेत. महिनाभरात प्रशासनाने यावर ठोस निर्णय न घेतल्यास २० गावांतील शेतकरी ‘साखळी उपोषण’ करणार असल्याचा इशारा माजी उपसभापती अंकुशराव ढवळे आणि करण ढवळे यांनी दिला आहे. यासंदर्भात जलसंपदा व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. पाण्याची भीषण टंचाई आणि प्रशासनाचे दुर्लक्ष – निवेदनात नमूद केल्यानुसार, जामखेड तालुक्यात मार्च ते जून या कालावधीत पाण्याची प्रचंड टंचाई भासते. केवळ शेतीच्या सिंचनासाठीच नव्हे, तर पिण्याच्या पाण्यासाठीही ग्रामस्थांना वणवण करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर उजनी उपसा सिंचन योजनेद्वारे पाणी सोडण्याची मागणी जोर धरत आहे. विशेष म्हणजे, अंकुशराव ढवळे यांनी ७ एप्रिल, ४ जानेवारी आणि २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सातत्याने पत्रव्यवहार करूनही अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. या प्रशासकीय दिरंगाईमुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे. शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या – उजनी पाणी पुरवठा: उजनी उपसा सिंचन योजनेद्वारे जामखेडच्या २० गावांना मार्च-एप्रिलमध्ये तातडीने पाणी उपलब्ध करून द्यावे. कृष्णा-भीमा स्थिरीकरण: या महत्त्वपूर्ण जलस्रोत प्रकल्पात जामखेड तालुक्याचा समावेश करण्यात यावा. ओव्हरफ्लोचे नियोजन: कुंठेफळकडे जाणाऱ्या पाईपलाईनमधून मौजे पाटोदा येथील नदीपात्रात ओव्हरफ्लोचे पाणी सोडावे. बंधाऱ्यांची दुरुस्ती: तालुक्यातील कोल्हापूर पद्धतीचे सर्व बंधारे तातडीने दुरुस्त करावेत. ही २० गावे रणांगणात उतरणार – या आंदोलनात पाटोदा, सांगवी, खामगाव, भवरवाडी, वंजारवाडी, दिसलेवाडी, धानोरा, अरणगाव, फक्राबाद, बावी, पिंपरखेड, हसनाबाद, गिरवली, कवडगाव, चोंडी, हळगाव, जवळा, रत्नापूर, आघी आणि मतेवाडी या गावांचा समावेश आहे. “आम्ही वारंवार विनंती करूनही सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. जर महिनाभरात सकारात्मक निर्णय झाला नाही, तर २० गावांतील शेतकरी रस्त्यावर उतरून साखळी उपोषण करतील.” — अंकुशराव ढवळे (माजी उपसभापती) या निवेदनाच्या प्रती विधान परिषद सभापती राम शिंदे, आमदार रोहित पवार, जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागांच्या अधीक्षक अभियंत्यांना पाठवण्यात आल्या आहेत. आता सरकार या गंभीर प्रश्नावर काय भूमिका घेते आणि जामखेडची तहान भागवते का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.