Jamkhed: जामखेड तालुक्यातील पाडळी, खुरदैठण आणि घोडेगाव मार्गावरील एसटीच्या नियमित फेऱ्या अचानक बंद झाल्याने गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी व प्रवाशांचे हाल होत होते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते माऊली भोंडवे यांनी आंदोलन छेडत प्रशासनाचे लक्ष वेधले. या आंदोलनाची दखल घेत एसटी प्रशासनाने अखेर बससेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. या मार्गावरील बससेवा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. अनेकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत होता, तर काहींना पायी प्रवास करावा लागत असल्याने संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. या समस्येकडे वारंवार लक्ष वेधूनही प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने भोंडवे यांनी विद्यार्थ्यांसह जामखेड आगार गाठून व्यवस्थापक प्रमोद जगताप यांची भेट घेतली. त्यानंतर बसस्थानकात ठिय्या आंदोलन करत भोंडवे यांनी आक्रमक भूमिका घेतली. “बससेवा सुरळीत सुरू होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला. अखेर प्रशासनाने तातडीने दखल घेत बंद फेऱ्या पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन दिले आणि प्रत्यक्ष बससेवाही सुरू करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळेनुसार सकाळ व सायंकाळी नियमित फेऱ्या सुरू ठेवाव्यात, तसेच विद्यार्थिनींना सुरक्षित प्रवासाची हमी द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी बोलताना माऊली भोंडवे म्हणाले, “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शहरात यावे लागते. मात्र मूलभूत वाहतूक सुविधेअभावी त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. प्रशासनाने वेळेत उपाययोजना न केल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.” या पाठपुराव्यानंतर सकाळच्या सत्रातील बससेवा सुरू झाल्याने विद्यार्थी व नियमित प्रवाशांनी समाधान व्यक्त करत भोंडवे यांचे आभार मानले.