जामखेड : स्थानिक गुन्हे शाखेने जामखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत नान्नज परिसरात छापा टाकून एकूण १ लाख ६८ हजार ९६० रुपये किंमतीची देशी दारू जप्त केली आहे. याप्रकरणी मुख्य आरोपी तुषार विठ्ठल जगताप (वय ३२, रा. शिवाजीनगर, जामखेड) याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात अवैध दारू विक्रीसह इतर अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते. यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकात पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग (पथकप्रमुख), पोलीस अंमलदार हृदय घोडके, पोलीस अंमलदार शामसुंदर अंकुश जाधव (फिर्यादी) आणि चालक अरुण मोरे यांचा समावेश होता. दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे जामखेड-नान्नज रोडवरील चुंबळी गाव शिवारात असलेल्या न्यू रशिका हॉटेलवर पथकाने धाड टाकली. तेथे ४४ सिलबंद देशी दारूचे बॉक्स आढळून आले. प्रत्येक बॉक्समध्ये ४८ सिलबंद बाटल्या होत्या, ज्याची एकूण किंमत १,६८,९६० रुपये आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीने आपले नाव तुषार विठ्ठल जगताप असल्याचे सांगितले. पोलीस अंमलदार शामसुंदर अंकुश जाधव यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ६८३/२०२५ महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अंतर्गत दाखल करण्यात आला आहे. आरोपीला लवकरच कोट्याडी न्यायालयात हजर केले जाणार आहे.”जिल्ह्यातील अवैध दारू विक्रेत्यांवर आणखी कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनी अशा अवैध धंद्यांची माहिती पोलिसांना द्यावी,” असे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी सांगितले. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली आहे. पुढील काळात अशा छाप्यांना अधिक गती दिली जाणार असून, परिसरातील पोलिस गस्तही वाढवण्यात आली आहे. अवैध दारू विक्रीची माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे. हेल्पलाइन क्रमांक : १०० किंवा ११२. या कारवाईमुळे जामखेड परिसरातील अवैध दारूचा धंदा बसला असून, गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.