Jamkhed News : नान्नज येथील हल्ल्याच्या निषेधार्थ जामखेड बंदची हाक

जामखेड : नान्नज (ता. जामखेड) येथे 24 ऑगस्ट 2025 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाई) चे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांच्या कुटुंबावर काही गावगुंडांनी शस्त्रांनी प्राणघातक हल्ला करून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना गंभीर जखमी केले होते. या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न आणि अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे. यासंदर्भात 26 ऑगस्ट रोजी समस्त आंबेडकरी समाजाने पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना निवेदन देऊन 8 दिवसांत आरोपींना अटक करण्याची मागणी केली होती. सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले यांनी आरोपींना अटक न झाल्यास जामखेड बंदचा इशारा दिला होता.
मात्र, 14 आरोपींपैकी फक्त 6 जणांना अटक झाली असून उर्वरित आरोपी मोकाट आहेत. शिवाय, एकतर्फी हल्ला होऊनही साळवे कुटुंबावरच खोटा गुन्हा दाखल झाल्याने अन्याय झाल्याची भावना आहे. याच्या निषेधार्थ समस्त आंबेडकरी समाजाने उर्वरित आरोपींना तात्काळ अटक, साळवे कुटुंबावरील खोटा गुन्हा मागे घेणे, कुटुंबाला पोलीस संरक्षण, आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई, मुख्य सूत्रधाराला अटक आणि केस फास्टट्रॅक कोर्टात चालवून विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती या मागण्यांसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
या मागण्यांसाठी रविवारी, 7 सप्टेंबर 2025 रोजी जामखेड बंद आणि खर्डा चौकात रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्धार समस्त भिमसैनिक जामखेड तालुका या सामाजिक संघटनेने जाहीर केला आहे. या बंदमध्ये जामखेड शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी सहभाग घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन संघटनेने केले आहे.





