Jamkhed News : जामखेडमधील गॅस एजन्सीचा मनमानी कारभार; ग्राहकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष

जामखेड : तालुका पुरवठा विभागाच्या निष्क्रियतेमुळे जामखेड शहरातील गॅस एजन्सीमध्ये गोंधळ आणि मनमानी कारभार वाढला आहे. ग्राहकांच्या परस्पर गॅस बुकिंग होत असून, याबाबत तक्रार केल्यास एजन्सीकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. नान्नज येथील सुमैय्या समिर शेख यांच्या बाबतीत असाच प्रकार घडला. त्यांनी गॅस बुकिंग न केले तरी त्यांचे पती, पत्रकार समिर शेख यांना २१ जून रोजी गॅस बुकिंग आणि डिलिव्हरी झाल्याचा मेसेज प्राप्त झाला. घरी चौकशी केल्यानंतर कोणीही बुकिंग न केल्याचे स्पष्ट झाले. बाबर गॅस एजन्सीकडे याबाबत विचारणा केली असता, त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही.
तहसीलदारांकडे तक्रारींचा खच, तरीही कारवाई नाही
समिर शेख यांनी याबाबत तहसीलदार गणेश माळी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली. गेल्या अनेक दिवसांपासून तालुका पुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे गॅस एजन्सीचा मनमानी कारभार सुरू आहे. तहसीलदार कार्यालयात अनेक तक्रारी दाखल झाल्या असूनही कोणतीही कारवाई झालेली नाही. एलपीजी ग्राहकांना वर्षाकाठी १२ सिलेंडर मिळतात, परंतु काही ग्राहक दीर्घकाळ गॅस घेत नाहीत. याचा गैरफायदा घेत गॅस एजन्सी ग्राहकांच्या परस्पर बुकिंग करून सिलेंडर काळ्या बाजारात विकत असल्याचा आरोप आहे. ही बाब गंभीर असताना पुरवठा विभाग याकडे कानाडोळा करत आहे. नागरिकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन गॅस एजन्सीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर: काळ्या बाजाराला खतपाणी
जामखेड तालुक्यात घरगुती गॅसचा मोठ्या प्रमाणात व्यावसायिक वापर होत आहे. हॉटेल्स आणि चहा विक्रेते यासाठी घरगुती गॅस सिलेंडर वापरत असल्याचे दिसून येते. सामान्य ग्राहकांना वेळेवर गॅस मिळत नसताना व्यावसायिकांना काळ्या बाजारातून तातडीने सिलेंडर उपलब्ध होतात. बुकिंग न करता हे सिलेंडर कसे मिळतात, हा प्रश्न अनुत्तरित आहे. पुरवठा विभागाच्या निष्क्रियतेमुळे हा गैरप्रकार वाढत असून, यावर नियंत्रण आणण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.





