जामखेड : जामखेड नगरपरिषदेच्या मतमोजणीदरम्यान मोठा वाद निर्माण झाला आहे. प्रभाग क्रमांक तीनचे केंद्र क्रमांक 2 चे मतदान मोजणीवेळी कंट्रोल युनिट नंबरमध्ये तफावत आढळून आली. तक्रार करूनही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दाखल न घेत मतमोजणी करून निकाल जाहीर केला आहे. याबाबत निवडणूक आयोगाने संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी अपक्ष उमेदवार सोनाली भोसले यांचे पती पांडुरंग भोसले यांनी केली आहे. जामखेड नगर परिषदेची २ डिसेंबर रोजी प्रभाग क्रमांक ३ मधील निवडणूक झाली होती. त्यावेळी मतदानाच्या शेवटी उमेदवारांच्या प्रतिनिधींना मतपेटी सील करताना मतदानाचा हिशोब फार्म वर कंट्रोल युनिट नंबर व सील पट्टी नंबर देण्यात आला होता. 21 डिसेंबर रोजी झालेल्या मतदान मोजणी दरम्यान प्रभाग क्रमांक 3 मधील केंद्र क्रमांक दोनचे मतमोजणी दरम्यान मतमोजणी मशीनवर कंट्रोल युनिट नंबर व सील पट्टी नंबरमध्ये तफावत आढळून आल्याने उमेदवारांच्या प्रतिनिधींनी आक्षेप घेऊन मतदान मोजणी थांबवून चौकशी करण्याची मागणी केली. यावेळी मोठा गोंधळ उडाला होता. त्यानंतर अपक्ष उमेदवार सोनाली पांडुरंग भोसले यांच्या प्रतिनिधींनी तक्रार अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केला होता. मात्र त्याची दखल न घेता कुणाच्यातरी दबावाला बळी पडून निवडणूक अधिकाऱ्यांनी कोणाचेही म्हणणे ऐकून न घेता पुन्हा मतमोजणी करून निर्णय जाहीर केला आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भूमिका ही संशयास्पद असून मशीनमध्ये घोटाळा केला असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे तातडीने कारवाई करण्याची मागणी अपक्ष उमेदवार सोनाली भोसले यांचे पती पांडुरंग भोसले यांनी केली आहे. जामखेड नगरपरिषदेच्या निकालात भाजपला दणदणीत यश मिळाले असून, नगराध्यक्ष पद भाजपच्या प्रांजल चिंतामणी यांनी जिंकले आहे. या निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला धक्का देत कमळ फुलवले आहे. मात्र, मतमोजणीदरम्यान उडालेल्या गोंधळामुळे आणि तक्रारींमुळे निकालावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत निवडणूक आयोग काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.