जामखेड : कुसडगाव, भोगलवाडी आणि सरदवाडी या ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मधुकर माधव खरात यांची गुरुवारी बिनविरोध निवड झाली. साडेचार वर्षांच्या कालावधीत चार सरपंच आणि पाच उपसरपंचांनी कारभार सांभाळून कुसडगाव ग्रामपंचायतीने विकासाचा आदर्श घालून दिला आहे. खरात यांच्या निवडीबद्दल सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी अभिनंदन केले. कुसडगाव ग्रामपंचायतीने एकीने आणि सहमतीने विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. गावाच्या विकासासाठी काळोबा ग्रामविकास पॅनलने निवडणुकीत सर्व नऊ जागांवर विजय मिळवला होता. माजी सरपंच दादासाहेब सरनोबत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुधीर राळेभात, बापूसाहेब कार्ले, रामदास शिरसाठ, आबा कात्रजकर, केशव कात्रजकर, प्रसन्न कात्रजकर, कै. रामचंद्र भोगल, पोपट कार्ले, दिलीप गंभीर, नागेश कात्रजकर, राम टिळेकर, भरत भोगल यांनी निवडणुकीत विरोधी पॅनलचा पराभव केला होता. सर्व सदस्यांना सरपंच आणि उपसरपंचपदाची संधी मिळावी, यासाठी दरवर्षी पदे बदलण्याची प्रथा येथे रूढ झाली आहे. त्यानुसार पहिले सरपंच दत्तात्रय कार्ले आणि उपसरपंच वंदना कात्रजकर यांनी एक वर्ष कारभार सांभाळल्यानंतर राजीनामा देऊन नवीन सदस्यांना संधी दिली. गेल्या साडेचार वर्षांत चार सरपंच आणि पाच उपसरपंचांनी यशस्वी कारभार करत गावाचा कायापालट केला. राज्यात अनेक ठिकाणी खुर्चीसाठी भांडणे होत असताना, कुसडगाव ग्रामपंचायतीने स्वेच्छेने राजीनामा देऊन नवीन सदस्यांना संधी देण्याचा आदर्श घालून दिला आहे. गुरुवारी झालेल्या सरपंचपदाच्या निवडीत मधुकर खरात यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र जोशी आणि ग्रामसेवक रामदास फणसे यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली. “एक नंबर ग्रामपंचायत” माजी सरपंच बापूसाहेब कार्ले म्हणाले, “कुसडगाव ग्रुप ग्रामपंचायत राज्यात उपक्रम राबवणारी एक नंबर ग्रामपंचायत आहे. गेल्या साडेचार वर्षांप्रमाणे पुढील सहा महिन्यांतही एकमताने विकासकामे करू. जास्तीत जास्त निधी आणून गावाचा विकास साधण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.” “सर्वांना विश्वासात घेऊन विकास करणार” नवनिर्वाचित सरपंच मधुकर खरात यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले, “माझी सरपंचपदी निवड होण्यात गावातील सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थांचा मोठा वाटा आहे. गावकऱ्यांची इच्छा होती की मी सरपंच व्हावे, ती पूर्ण झाली. सर्वांना विश्वासात घेऊन कुसडगाव, भोगलवाडी आणि सरदवाडी या तिन्ही गावांचा विकास करणार आहे.” कुसडगाव ग्रामपंचायतीचा कार्यकाळ आता फक्त सहा महिने शिल्लक आहे. या कालावधीतही गावाच्या विकासाला गती देण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.