सिध्दार्थनगर व साठेनगरमधील पाणी पुरवठा सुरळीत करा

जामखेड : खर्डा रस्ता परिसरात गटारीचे काम चालू असताना पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन जेसीबीच्या सहाय्याने तुटल्याने सिध्दार्थ नगर व साठे नगर मध्ये नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून जामखेड नगरपरिषदेला वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा मुख्यधिकारी दखल घ्यायला तयार नसल्याने नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला आहे. याबाबत नगरपरिषदेला निवेदन देण्यात आले आहे.
खर्डा चौक ते लक्ष्मीआई मंदिर रस्त्याच्या बाजूच्या गटारीचे काम चालू असून खोदकाम करताना पाणीपुरवठा करणारी नगरपरिषदेची पाईपलाइप तुटल्याने सिध्दार्थ नगर व साठे नगर मधील नागरिकांना गेल्या दोन महिन्यापासून भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. वेळोवेळी नगरपरिषदेला निवेदन देऊनही कोणत्याही प्रकारची दाखल न घेतल्याने नागरिकांनी येत्या चार दिवसात पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास गुरुवार दि.12 रोजी डाॅ बाबासाहेब आंबेडकर सर्कल, खर्डा रोड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.
निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले, दादा घायतडक, प्रमोद सदाफुले, किशोर कांबळे, रवी सोनवणे,मनीष घायतडक,अक्षय घायतडक, अमोल सोनवणे सह दोनशे नागरिकांच्या सह्या आहेत.





