प्रख्यात विधिज्ञ प्रशांत भूषण यांचा दावा
नवी दिल्ली : जामिया मिलीया इस्लामिया विद्यापीठाजवळ सुधारित नागरिकत्व कायद्याच्या निषेधार्थ सुरू असणाऱ्या मोर्चावर गोळीबार करणाऱ्या तरूणाची सादर केलेली सीबीएसई बोर्डाची गुणपत्रिका बनावट असल्याचा दावा प्रख्यात वकील प्रशांत भूषण यांनी केला आहे.
हा हल्लेखोर अल्पवयीन असल्याचा पुरावा म्हणून जी मार्कशीट दाखवण्यात आली आहे, ती बनावट आहे. हे काही प्रसिध्दी माध्यम नाही. ते बनावट बातम्या पेरण्याचे सरकारचे एक साधन आहे. आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ भूषण यांनी एक ट्विट पोस्ट केली आहे. त्यात या मार्कशीटमध्ये जेवार पब्लीक स्कुलच्या कोडमधील विसंगती दाखवण्यात आली आहे.
हे स्कूल जरी सीबीएससीशी संलग्न असले तरी त्यात नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिलेला नाही. सीबीएससीच्या वेबसाईटरप्रमाणे त्यात विभाग नाहीत, असे अन्य एका ट्विटरवर म्हटले आहे.
आश्चर्यकारकरित्या या हल्लेखोराने गोळी झाडल्यानंतर अवघ्या मिनिटभरात त्याची मार्कशीट जनतेसमोर आली होती. त्या आधारे तो अल्पवयीन असल्याचा दावा करण्यात आला होता. या हल्ल्यानंतर दिल्ली पोलिसांची भूमिका वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. हा गोळीबार करत असताना त्याच्या मागे पोलीस शांतपणे बसून असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते.